मनाला चटका लावणारी घटना
वृध्दाश्रमात मयत झालेल्या वृद्धाच्या मुलाने पित्याचे शेवटचे तोंडही पाहिले नाही. उलट, त्यांना कोणीही नाही, बेवारस आहेत म्हणून नोंद लावून अंत्यविधी उरका, असा निरोप मुलाने वृध्दाश्रम संस्थाचालकांना पाठवला. मृत वृद्ध आजोबा मोरवंचीत प्रार्थना फाउंडेशनमार्फत मोफत चालविल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात गेल्या वर्षापूर्वी दाखल झाले होते. त्यांच्या मागे दोन मुलं आणि वृद्ध पत्नी असा परिवार आहे. परंतु कौटुंबिक कलहामुळे घरी त्यांचा सांभाळ केला जात नव्हता.
कौटुंबिक कलहातुन वृद्ध वडिलांची ससेहोलपट
वृध्दाश्रमात मयत झालेले आजोबा याना दोन मुले, वृद्ध पत्नी,सुना नातवंडे असा परिवार आहे. बेवारस म्हणून ज्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले आजोबा हे मुळचे मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावचे रहिवासी होते. हयात असताना ते मिळेल ते काम करायचे. १५-२० वर्षापासून त्यांचा कुंटुंबाशी फारसा संबंध नव्हता, कधी-कधी ते घरी पैस नेऊन द्यायचे घरामध्ये त्यांच्याबद्दल चांगले मत नव्हते. कौटुंबिक कलह होता, कुटुंबाकडे फारसे लक्ष नव्हते. म्हणून पत्नी, दोन मुले यांच्या मनात त्यांच्याबद्दल कटुता आणि निष्ठुरता निर्माण झाली होती, अशी माहिती संस्था चालक प्रसाद मोहिते यांनी दिली.
खंगलेल्या आजोबांना प्रार्थना फौंडेशनची उबदार माया मिळाली होती
उतारवयात असलेल्या वृद्ध आजोबांना मुलांनी घराबाहेर काढले होते.त्यांचा थोरला मुलगा व्यावसायिक चित्रकार, तर धाकटा मुलगा व्यापारी आहे. घराबाहेर काढल्याने शिरापूर गावात भटकत फिरत होते. वृद्धाश्रमात येण्यापूर्वी आजोबांना हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला होता. मुलांनी घराबाहेर काढल्यानंतर त्यांना गावातील काही लोकांनी वृद्धाश्रमात दाखल केले होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. याबाबतची माहिती त्यांच्या घरी कळविण्यात आली होती. परंतु रुग्णालयात भेटण्यासाठी एकही मुलगा आला नव्हता. शेवटी बुधवारी सकाळी वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बाप म्हणायला लाज वाटते; निष्ठुर मुलांचं निरोप
वडिलाच्या मृत्यूबद्दल कुंटुंबियांना वृद्धाश्रम चालकांनी कळविले होते. पित्याच्या अंत्यदर्शनासाठी येण्यासही सुरवातीस मुलाने नकार दिला होता. वृध्दाश्रम संस्था चालक प्रसाद मोहितेंनी आग्रह केल्यावर मोठा मुलगा आला. वृध्दाश्रमात दहा फुटाच्या अंतरावर असलेल्या पित्याचे तोंड न बघत मुलगा निघून गेला. उलट,त्यांना कोणीही नाही,बेवारस आहेत म्हणून नोंद लावून अंत्यविधी उरका, असे निष्ठुर मुलाने लिहून दिले. बाप म्हणायची लाज वाटते असंही तो मुलगा म्हणाला, जन्मदात्या पित्याविषयी मुलाने वापरलेले शब्द मनाला चटका लावणारे आहे.