मुसळधार पाऊस तरी सुट्टीच्या घोषणेस विलंब, मुख्याध्यापकांचे हात बांधलेले, विद्यार्थी-पालक हवालदिल

रोहन टिल्लू, मुंबई : मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई या जिल्ह्यांमध्ये बुधवार रात्रीपासून मुसळधार पाऊस असूनही मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यास गुरुवारी विलंब लागल्याने पालक हवालदिल झाले होते. याबाबत पालक सातत्याने मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाकडे विचारणा करत असताना मुख्याध्यापक स्थानिक प्रशासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते. त्यामुळे शाळांना पावसाळी सुटी देण्याचा निर्णय कोणाचा, यावरून चर्चा सुरू होती. याबाबत अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनच घेईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. मात्र असा निर्णय जाहीर होण्यासाठी लागणाऱ्या विलंबाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठाणे, नवी मुंबई, रायगड, कल्याण-डोंबिवली महापालिका अशा सर्वांनीच गुरुवारी सकाळी साडेदहा-अकरा वाजेपर्यंत सुटी जाहीर केली. मात्र मुंबई महापालिकेने दुपारी दोनपर्यंत सुट्टीचे निर्देश दिले नव्हते. याबाबत मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मुख्याध्यापकांना वर्षातून दोन सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार असतात, असे गोपनीयतेच्या अटीवर सांगितले. त्यामुळे एखाद्या भागात प्रचंड पाऊस असेल, तर त्या भागातील शाळांमधील मुख्याध्यापक सुट्टी जाहीर करू शकतात, असे ते म्हणाले.

आपत्कालीन सुट्टीचा अधिकार नाही

‘मुख्याध्यापकांना आपत्कालीन सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार नाही. पावसामुळे निर्माण होणारी परिस्थिती संपूर्ण जिल्हा किंवा महापालिकेच्या भागासाठी असते. त्यामुळे अशा वेळी सुट्टी द्यायची अथवा नाही, याचे अधिकार सरकारकडे असतात. सरकारचे पत्र आल्याशिवाय आम्ही शाळा सोडू शकत नाही’, असे पार्ले टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुक्ता मिठे यांनी सांगितले.
Pune Rain: पुण्यात पावसाचा रुद्रावतार, सर्व उच्चांक मोडले, आजही दक्षतेचा इशारा

शासन निर्णय राबवावाच लागतो

गुरुवारी मुंबईतील शाळा सोडण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी दुपारी दोननंतर जाहीर केला. तोपर्यंत पावसाचा जोर ओसरला होता आणि अनेक शाळांमध्ये दुपारचे वर्ग सुरू झाले होते. तरीही शासनाचा निर्णय आल्यावर आम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे आम्ही शाळा सोडली. अनेक पालकांची त्यामुळे अडचण झाली. त्यांच्या सोयीसाठी आम्ही त्यांच्या पाल्यांना शाळेतच थांबवून ठेवले. शेवटच्या मुलाचे पालक येईपर्यंत शिक्षकही शाळेतच थांबले होते, अशी माहिती अंधेरीच्या परांजपे विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम कोळी यांनी दिली.

व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, तरीही…

आजकाल प्रत्येक शाळेत प्रत्येक वर्गाच्या पालकांचे वेगवेगळे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. शाळेविषयीची सर्व माहिती या ग्रुपवर टाकली जाते. पण जोपर्यंत सरकारकडून सुट्टी जाहीर केल्याचा निर्णय येत नाही, तोपर्यंत आम्हीही पालकांना काही सांगू शकत नाही, असे या दोन्ही मुख्याध्यापकांनी सांगितले.

हवामान विभागाकडून रेड ॲलर्ट आल्यानंतरच विविध जिल्हा प्रशासने सुट्टी जाहीर करतात. गुरुवारीही हवामान विभागाकडून असा ॲलर्ट आल्यावर मुंबई महापालिका आयुक्तांनी तो निर्णय जाहीर केला. पावसाळी सुटी मुख्याध्यापक जाहीर करू शकत नाहीत. तो अधिकार जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेच राहील. मात्र, हे अधिकारीही हवामान विभागाने ॲलर्ट दिल्याशिवाय काहीच निर्णय घेऊ शकत नाहीत, ही बाब लक्षात घ्यायला हवी.

दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

Source link

Mumbai Heavy Rain Alertmumbai newsMumbai rainsMumbai School Holidayदीपक केसरकरमुंबई पाऊस अपडेटमुंबई रेड अलर्टमुंबई शाळा सु्ट्टी
Comments (0)
Add Comment