काल दिवसभर रेस्क्यू करत जवळपास १६० कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या सर्वांच्या जेवणाची सोय महापालिकेकडून करण्यात आली होती. १६ ठिकाणी या पूरग्रस्तांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र अचानक नागरिक वाढल्याने अन्न पुरवठा करण्यासाठी माणसं कमी पडली. यावेळी हिंदू, मुस्लिम आणि शीख धर्मियांकडून संयुक्तिकरित्या जेवण बनवण्यात आले.
शीख धर्मियांनी जेवण बनवले, मुस्लिम धर्मीयांनी त्याचे पॅकिंग केले आणि हिंदू धर्मीयांनी त्याचे वाटप केले. या एकत्र जुळून आलेल्या योगायोगामुळे सर्वधर्म एकत्र असल्याचे पाहायला मिळाले.
गुरुवारी पुण्यामध्ये खडकवासला धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरले होते. पहाटेपासूनच घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक नागरिक अडकून पडले होते. प्रशासनाकडून हालचाली देखील सुरू होत्या. मात्र या पूरग्रस्तांसाठी खाण्या पिण्याची सोय करणे गरजेचे होते. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या शेल्टर होम्समधील नागरिकांना रात्रीचे जेवण देण्यासाठी हिंदू-मुस्लिम-शीख धर्मियांकडून संयुक्त श्रमदान करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी शीख धर्मियांकडून १००० जणांसाठी जेवण बनवण्यात आले. मुस्लिम धर्मीय तरुणांनी या जेवणाचे पॅकेट्स तयार केले. तर हिंदू धर्मीय व गणेश मंडळाचे कार्यकर्ते या अन्नाच्या पॅकेटचे शेल्टर होममध्ये जाऊन वितरित केले. अशा संकट काळात सर्वधर्मीय एकत्रितपणे कसे काम करतात, याचे विधायक रूप बघायला मिळाले.
एखादं संकट आलं तर महाराष्ट्रामध्ये, त्यातही पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात सर्वधर्मीय एकच असल्याची भावना यावेळी पाहायला मिळाली. हिंदू मुस्लिम शीख यांनी एकत्र येऊन कोसळलेल्या नागरिकांना जेवण देऊन संपूर्ण देशात आदर्शवत असे काम केले आहे.
कोण होते सहभागी?
वितरण : जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून वैभव वाघ, पियुश शहा, ऋशिकेष कायत, विशाल ओव्हाळ, विशाल सुतार, जय गणेश व्यासपीठ
पॅकिंग : जावेद खान, उम्मत सामाजिक संस्था
अन्न तयार केले : चरणसिंग सहानी, विश्वस्त हॉलीवुड गुरुद्वारा, कॅंप