नवी मुंबईतील कामोठे येथे राहणारा सागर मिसाळ हा निळजे येथे नातेवाईकांकडे आला होता. बुधवारी रात्री २ वाजता दुचाकीवरुन पुन्हा कामोठ्याला निघाला होता. कल्याण-शिळफाटा रस्त्यावरुन जात असताना या रस्त्यावरील एका इमारतीसमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे त्याच्या दुचाकीचा तोल गेला आणि भरधाव वेगात जाणाऱ्या कारने सागरच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
अपघातानंतर कार चालक पळून गेला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला सागर त्याच ठिकाणी पडला होता. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सागरच्या डोक्याला आणि अंतर्गत भागात जखमा झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सागर याच्या मृत्यूची चौकशी चालू असताना घटनास्थळाच्या येथील इमारतीसमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पाहणी करण्यात आली. या पाहणीत अपघाताचा हा प्रकार समोर आला. सागर याचा मामा राजेश दुगड (रा. घाटकोपर) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
रस्त्यांवर जीवघेणे खड्डे
ठाणे जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्यांची खूपच दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे जीवघेणे अपघात होण्याची शक्यता असतानाही खड्डे बुजवले जात नसल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या ताकीदीलाही अधिकारी जुमानेत
‘खड्ड्यांमुळे अपघात होऊन कुणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्या. रस्त्यावर एकही खड्डा राहता कामा नये. काहीही करा पण खड्डे बुजवा. खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला, हे पुन्हा कानावर येता कामा नये’. अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, या ताकीदीनंतरही जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले नसून मुख्यमंत्र्यांच्या ताकीदीलाही अधिकारी जुमानत नसल्याचे दिसून येते.