दरवर्षी उन्ह्याळ्यात कांद्याचे दर सरासरी असतात, तर पावसाळ्यात ते वाढतात. त्यामुळे बहुतांश लोक पावसाळ्यासाठी कांद्याची आगाऊ खरेदी करून ठेवतात. मात्र यावर्षी उन्हाळ्यात चांगला कांदा बाजारात आला नाही. ओलसर कांदा येत असल्याने अनेकांना पावसाळ्यासाठी कांद्याची खरेदी करता आली नाही. ओलसर कांदा तीन-चार महिने टिकत नाही. त्यातच बाजारात येणाऱ्या कांद्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे आत्ता बाजारात कांद्याला मोठी मागणी असूनही आवक कमी आहे. दररोज घाऊक बाजारात कांद्याच्या अवघ्या सरासरी ७० ते ७५ गाड्या येत आहेत. त्यामुळे कांद्याचे दर चढेच आहेत. घाऊक बाजारात कांदा २८ रुपये किलोपर्यंत पोहोचला असून किरकोळ बाजारात तो ५० रुपये किलोने विकला जात आहे. घाऊक बाजारात बटाट्याच्या किमतीही २८ ते ३० रुपये किलोवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात बटाट्याचा दर ५० रुपये किलो झाला आहे. घाऊक बाजारात जानेवारीपासून बटाट्याची आवक कमीच होत असल्याने त्यांचे दर चढे राहिले आहेत. आताही बाजारात बटाट्याच्या ५० ते ६० गाड्या येत आहेत. आवक कमी असल्याने बटाट्याच्या दरात वाढ कायम आहे.
त्याचवेळी आवक कमी असल्याने लसणाचे दरही वाढत आहेत. सध्या बाजारात मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून लसूण येत आहे. गुजरातमधून येणारा लसूण थांबला आहे. त्यामुळे मागणीइतका पुरवठा होत नाही. परिणामी, दरवाढ कायम आहे. दिवाळीपर्यंत बाजारात हीच परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत नागरिकांना चढ्या दरानेच लसूण खरेदी करावा लागणार आहे, अशी माहिती घाऊक व्यापारी दीक्षित शहा यांनी दिली