हे जहाज अलिबाग समुद्रात भरकटले असल्याची माहिती मिळताच अलिबाग उप विभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. जे.एस डब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर कंपनीची यंत्रणा बार्ज काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. गुरूवारी रात्री उशीरा बार्ज काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र अंधार आणि खराब हवामानामुळे रात्री मदत व बचाव कार्य पूर्ण करता आले नव्हते.
आज शुक्रवार २६ जुलै रोजी भारतीय तट रक्षक दलाच्या चौपरच्या साहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करीत बार्ज वरील चौदा खलाशी यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सकाळी ८.५६ ते ९.५८ या वेळेत हे बचावकार्य राबवण्यात आले. या सर्वांना हेलिकॉप्टरच्या मदतीने अलिबाग येथे आणण्यात आले. या खलाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता ते सुखरूप असल्याने सर्व खलाशांना जेडब्ल्यू कंपनी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली आहे. जहाजावर अडकलेले सर्व खलाशी हे विविध राज्यातील होते.
जहाज किल्ल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या खडकावर आदळले. त्यामुळे जहाजाचा खालील भाग फुटला असून त्यामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी मटाशी बोलताना दिली.