अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजित मरे यांनी हा आदेश दिला. दिलीप खेडकरांनी तक्रारदार व साक्षीदारांशी कोणत्याही माध्यमातून संपर्क करून त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये, गुन्ह्याच्या तपासात यंत्रणेला मदत करावी, सात दिवसांच्या आत त्यांनी स्वतःचा व जवळच्या दोन नातेवाइकांचा कायमस्वरूपी पत्ता आणि मोबाइल क्रमांक तपास अधिकारी किंवा संबंधित पोलिस ठाण्यात जमा करावा, अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत. हा गुन्हा घडल्यानंतर वर्षभराहून अधिक काळाने पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दिलीप खेडकरच्या सहआरोपीवर आहे, असे नमूद करून न्यायालयाने दिलीप खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शिक्कामोर्तब केले.
शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप
मुळशी तालुक्यातील धाडवली गावातील जागेच्या वादातून मनोरमा खेडकरने शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप करणारा व्हिडिओ ‘व्हायरल’ झाला. या प्रकरणात मनोरमासह तिचा पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर व दोन पुरुष व दोन महिला बाउन्सरविरोधात शेतकऱ्याला मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिलीप खेडकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर
त्यांच्याविरोधात पंढरीनाथ कोंडिबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव, दौंड) या शेतकऱ्याने पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणात मनोरमा खेडकर यांनी जामीनासाठी, तर दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अॅड. सुधीर शहा यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. त्यावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी अॅड. सुधीर शहा यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दिलीप खेडकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.