पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून सामूहिक राजीनामे दिले असून जड अंत:करणाने हा निर्णय घेत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला फुटीचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे.
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यासह ठाण्यातही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय नेते, पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी घेतला. ठाण्यात तत्कालीन खासदार राजन विचारे यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने ठाकरे यांच्या शिवसेनेलाही साथ दिली होती. त्यावेळी विचारे यांचे खंदे समर्थक असलेल्या युवा कार्यकर्ते अर्जुन डाभी, किरण जाधव यांनी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे डाभी यांना युवासेना उपजिल्हाप्रमुख व जाधव यांच्यावर ठाणे शहर अधिकारी अशी जबाबदारी देण्यात आली. एकीकडे शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी राज्यभर युवासेनेचे मेळावे घेतले. तर ठाण्यात भव्य मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. मात्र ठाण्यात ठाकरे गटाची युवासेना फारशी सक्रिय नसल्याचे चित्र दिसून येत होते. त्यात लोकसभा निवडणुकीत विचारे यांचा पराभव झाल्याने पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला.
युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवले. यामध्ये उपजिल्हाप्रमुख अर्जुन डाभी, शहर अधिकारी किरण जाधव यांच्यासह शाखाप्रमुख अभिषेक शिंदे, समन्वयक दीपक कनोजिया आणि विभाग अधिकारी राज वर्मा यांचा समावेश आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी युवासेनेचे राहुल लोंढे, नितीन लांडगे, शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निष्ठेवर प्रश्नचिन्ह
आदित्य ठाकरे यांना दिलेल्या पत्रात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या १५ वर्षात आम्ही सातत्याने युवा सेनेच्या स्थापनेपासून संघटन मजबूत करण्याचे काम प्रामाणिकपणे काम केले आहे. प्रसंगी विरोधकांना अंगावर देखील घेतले आहे. परंतु गेल्या दोन वर्षात काही निवडक पदाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या अंतर्गत गटबाजीमूळे आमच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे आम्ही जड अंतःकरणाने सामूहिकरित्या पदांचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.
सोडून जाणाऱ्यांचा विचार केला नाही : केदार दिघे
संकटाच्या काळात खांद्याला खांदा लावून लढत आहेत, त्यांचा विचार करू. सोडून जाणाऱ्यांचा विचार बाळासाहेब व आनंद दिघे यांनी ही केला नाही. ठाण्यात शिवसेना नव्याने उभी राहत आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाणारी नवी पिढी समोर येते, अशी प्रतिक्रिया या राजीनामा प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ‘एक्स’वर पोस्टद्वारे दिली.
भविष्यात मोठे धक्के : पूर्वेश सरनाईक
ठाकरे गटाच्या युवासेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या गटबाजीला सर्वच पदाधिकारी कंटाळले असून त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्यामुळेच ठाण्यातील या पदाधिकाऱ्यांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात अनेक मोठे धक्के ठाकरे गटाला बसणार आहेत.
– पूर्वेश सरनाईक, कार्याध्यक्ष, युवासेना