शहरातील श्वानांची संख्या आणि श्वानप्रेमींच्या मागणीनुसार महापालिकेतर्फे श्वानांसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जातात. त्यासाठी महापालिका खर्चही करते. पाळीव श्वानांसाठी महापालिकेच्या वतीने वाशीत डॉग पार्क उभारण्यात आले आहे. तिथे श्वानांसाठी खास खेळणी, झोपाळे लावण्यात आले आहेत. तर, शहरातील १० महत्त्वाच्या ठिकाणी, उद्यानांत श्वानांना नैसर्गिक विधीसाठी खास डॉग पिट तयार करण्यात आले आहेत. अशा सुविधा दिल्या जात असताना अनेक श्वानप्रेमी श्वान पाळत असूनही महापालिकेचा परवाना घेण्यासाठी मात्र टाळाटाळ करताना दिसत आहेत. महापालिकेकडे नोंद असलेली एकूण श्वानांची संख्या आणि परवाना घेणाऱ्यांची संख्या यात मोठी तफावत आहे. मात्र आत्ता श्वान पाळण्याच्या नियमात बदल झाल्याने श्वानप्रेमींना श्वानपरवाना घेणे बंधनकारक झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांसाठी नियम प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, सर्व श्वानमालकांनी श्वानपरवाना घेण्यासाठी, संबंधित विभाग कार्यालयाकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाळीव श्वान अंदाजे पाच हजार
नवी मुंबईत सन २०१२मध्ये व त्यानंतर २०१९मध्ये पशुगणना झाली होती. २०१२च्या जनगाणेनुसार शहरात एकूण ३११० पाळीव श्वान असल्याचे समोर आले होते. त्यापैकी केवळ ११९ श्वानप्रेमींनी परवाने घेतले होते. २०१९च्या पशुगणनेचा अहवाल समोर आलेला नाही. मात्र आता पाळीव श्वानांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली असावी, असा अंदाज आहे. मात्र यापैकी परवाने घेतलेल्या श्वानांची संख्या ५०० तरी आहे का, असा प्रश्न आहे. याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
श्वानपरवाने घेण्यासाठी काय कराल?
‘श्वानपरवाना घेण्यासाठी, महापालिकेच्या अर्जासोबत श्वानाचा लसीकरणाचा अहवाल, मालकाचे आधार कार्ड, श्वानाचे छायाचित्र आणि परवाना घेण्यासाठी ८५ रुपये शुल्क भरावे लागते. या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. त्यासाठी केवळ ८५ रुपये खर्च येतो. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यामुळे श्वानप्रेमी नागरिकांनी श्वानपरवाना घेण्यासाठी पुढे यावे आणि कारवाई टाळावी,’ असे आवाहन नवी मुंबई महापालिकेचे बेलापूर विभागाचे अधिकारी शशिकांत तांडेल यांनी केले आहे.