पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खेड-आळंदी, जुन्नर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने पाय भक्कम रोवले आहेत. यामध्ये खेड आणि जुन्नर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटामध्ये कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. लोकसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेत सर्वात अग्रभागी शिवसेना उद्धव ठाकरे गट राहिलेला पाहायला मिळाला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना देखील याच दोन विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. या दोन विधानसभा मतदारसंघात आता शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना झाला आहे. विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील पहिली विधानसभा निवडणूक शिवसेना पक्षाकडूनच लढवली होती. माजी आमदार स्व. नारायण पवार हे देखील शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून एका निवडणुकीला सामोरे गेले होते. तर स्व. सुरेश गोरे हे देखील या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत.
खेड तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक असल्याने मुंबईत मराठी मतदार शिवसेनेला नेहमीच झुकते माप देत आहेत. त्यामुळे खेड तालुक्यात देखील पारंपरिक शिवसैनिक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याच पद्धतीने जुन्नर, आंबेगाव या तालुक्यात देखील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यायाने शिवसेनेची मोठी ताकद या खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात पाहायला मिळते.
याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वाधिक लक्ष खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात केंद्रित केले आहे. यापूर्वी देखील खासदार संजय राऊत यांनी खेड तालुक्यात येऊन शिवसेना आणि आमदार मोहिते पाटील यांच्यात झालेल्या संघर्षात मोहिते पाटील यांच्या विरोधात भूमिका घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बळ दिले होते. दरम्यान संजय राऊत यांनी त्यावेळी इशारा देखील दिला होता की, “या तालुक्यातील पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल.” त्यामुळे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
या मतदारसंघात प्रबळ दावेदार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी रामचंद्र काळे आहेत त्याचबरोबर अशोक खांडेभराड, पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांनी देखील इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये बाबाजी काळे यांनी अगोदरच तयारी सुरू केली आहे. तालुक्यातील १० हजारांहून जास्त महिलांना देवदर्शन वारी घडवून आणल्या आहेत, त्याचबरोबर बाबाजी काळे यांच्या संपूर्ण तालुक्यात दांडगा जनसंपर्क असल्याने बाबाजी काळे हेच प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी- विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली तर दिलीप मोहिते पाटील विरुद्ध बाबाजी काळे अशीच लढत पाहायला मिळू शकते.