Baramati : कुस्ती स्पर्धा की राजकीय आखाडा? जय पवार सक्रिय, काका विरुद्ध पुतण्या आमनेसामने

बारामती, दीपक पडकर : एकसंघ राष्ट्रवादी काॅंग्रेस फूटल्यानंतर बारामतीत आता कुस्त्यांच्या आखाड्यातही राजकारण सुरु झाले आहे. एरव्ही बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एकच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान होत होते. यंदा युवा नेते जय पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांचे मैदान रविवारी दि. २८ रोजी बारामतीत आयोजित केले आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी ज्या शारदा प्रांगणात हे मैदान होत होते. तीच जागा जय पवार यांनी निवडली आहे. त्यातही विशेष भाग असा की बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार हे आहेत. पक्ष एकसंघ असताना त्यांच्याकडे हे पद आले आहे. आता जय पवार यांनी आयोजिलेली स्पर्धा ही बारामती तालुका कुस्तीगीर संघाकडून आयोजित केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी युगेंद्र यांचा त्यात सहभाग नाही. कारण ते शरद पवार यांच्या सोबत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत शरदचंद्र पवार गटाची बारामती शहर, तालुक्याची जबाबदारी युगेंद्र पवार यांनी सांभाळली. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाची छाप निर्माण केली. शरद पवार यांच्यासोबत उभे राहताना त्यांनी आपले सख्ये काका अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले. राजकारणात दंड थोपटून महायुतीच्या उमेदवाराला त्यांनी बारामतीत पाणी पाजले. आता त्यांना शह देण्यासाठी हे मैदान आयोजित केले जात असल्याचीही चर्चा आहे.
Eknath Shinde: दादांच्या बालेकिल्ल्यात भाईंची फिल्डींग; शिंदेसेनेत जोरदार इनकमिंग, महायुतीत घडतंय काय?

युगेंद्र पवार यांना तोडीस तोड देण्यासाठी अजित पवार गटाकडून आगामी विधानसभा पाहता जय पवार यांना मैदानात उतरवण्यासाठी तयारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. बारामतीकरांना जरी वरवर पाहता कुस्तीचा आखडा वाटत असला तरी जय पवार यांना राजकीय मैदानात उतरवण्यात येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण विधानसभेच्या तोंडावर हळहळू जय पवार सुद्धा बारामतीत सक्रिय झालेले दिसतात.
Ajit Pawar: जागावाटप लवकर करा! अजित पवार सर्वाधिक आग्रही; दादांना नेमकी कोणती काळजी?

युगेंद्र यांनी यावर याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे याबाबत अधिकृत माहिती नाही. परंतु कोणी मैदान आयोजित करत असेल तर ते चांगलेच आहे. त्या माध्यमातून मल्लांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. पण आम्ही गेली अनेक वर्षे सुरु असलेली प्रथा यापुढेही सुरु ठेवणार आहोत. येत्या १२ डिसेंबरला शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी मैदान आयोजित करणार असल्याचे युगेंद्र यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे रविवारी बारामतीत होणाऱ्या मैदानात कोणताही अडथळा येवू नये, यासाठी भव्य डोम उभारला गेला आहे. पावसाचा कोणताही अडथळा त्यामुळे निर्माण होणार नाही. या कुस्ती मैदानासाठी मंत्री धनंजय मुंडे, संजय बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत. या मैदानासाठी जय पवार यांच्यासह शहर, तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या मैदानाकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

Source link

ajit pawarbaramati kushti aakhdajay pawar newsYugendra Pawarअजित पवारजय पवारबारामती कुस्ती स्पर्धायुगेंद्र पवारशरद पवार
Comments (0)
Add Comment