सरकारी कार्यालयांमध्ये संदेश पोहोचविण्यासाठी व्हॉट्सअॅप किंवा ‘ई-मेल’चा वापर केला जातो. सरकारी अहवाल, महत्त्वाच्या माहितींचे आदान-प्रदान करण्यासाठी या बाह्यस्रोतांचाच वापर केला जातो. त्यामुळे गोपनीय माहिती उघड होण्याची शक्यता असते. त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘संदेस’ ही संदेशवहन सेवा विकसित करण्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रणालीचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना सरकारी कामांसाठी व्हॉट्सअॅप, ‘जी मेल’ आणि तत्सम अॅपचा वापर करण्यास मनाई आहे.
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रातर्फे (एनआयसी) ‘संदेस’ या अॅपचा वापर सध्या केंद्र सरकारमधील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच विविध राज्य सरकारमधील २०० हून अधिक सरकारी संस्था आणि ३५० हून अधिक ई-गव्हर्नन्स अॅप्लिकेशन्समध्ये संदेश, सूचना व ओटीपी पाठवण्यासाठी केला जात आहे. या अॅपचे विविधांगी कार्य आणि उपयोग विचारात घेता राज्य सरकारने कामकाजात ‘संदेस’ हे अॅप वापरण्याचे ठरवले आहे.
असे आहे ‘संदेस’
– सरकार ते सरकार आणि सरकार ते नागरिक यांच्यात संवाद आणि संदेशवहन सुलभ होणे हा हेतू
– मुक्तस्रोत आधारित, सुरक्षित आणि स्वदेशी संदेशवहन प्रणाली म्हणून ‘संदेस’ अॅप विकसित
– या अॅपचे धोरणात्मक नियंत्रण सरकारकडे आहे.
– यात पाठविण्यात येणारे संदेश ‘एंड टू एंड एन्क्रिप्टेड’ असतील.
– कोणत्याही गैरवापराची तक्रार झाल्यास गैरवापराचा उगम शोधण्याची क्षमता या अॅपमध्ये आहे.
अॅपची वैशिष्ट्ये
संदेस या अॅपच्या माध्यमातून सर्व प्रकारचे संदेश सुरक्षितपणे पाठविणे, स्टोअर करणे, ओटीपी पाठवणे व वितरित न झालेला डेटा सुरक्षित ठेवणे शक्य आहे, तसेच कार्यालयाच्या गरजेनुसार त्याचे कस्टमायझेशन करण्याची सुविधा आहे.