आदिवासी तालुक्यांमध्येही सलग चार दिवस पावसाने हजेरी लावली. परिणामी सुरगाण्यात १२ हजार हेक्टर, त्र्यंबकेश्वरमध्ये नऊ हजार हेक्टर तर इगतपुरी तालुक्यात सुमारे २२ हजार हेक्टरवर भाताची लावणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत उद्दिष्टांपैकी पाच लाख ६७ हजार ४९२ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यंदाच्या पेरण्यांमध्ये मका, सोयाबीन आणि कपाशीवर शेतकऱ्यांचा भर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ हजार १९ हेक्टर क्षेत्रावर भात, दोन लाख ३८ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर मका, ९९ हजार ३१४ हेक्टरवर सोयाबीन तर ३० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पेऱ्यासाठी सहा लाख ४१ हजार ७७१ हेक्टर क्षेत्राचे उद्दीष्ट आहे.
विसर्गामुळे शेतीला दिलासा
जिल्ह्यातील दारणा, नांदूर मध्यमेश्वर या धरणांमधून जायकवाडीच्या दिशेने हंगामातील पहिलाच विसर्ग सुरू झाला. इगतपुरी तालुक्यातील भावली धरणदेखील १०० टक्के भरले. नाशिक जिल्ह्यात पावसाचे वातावरण असले तरीही नांदूर मध्यमेश्वरच्या विसर्गावर अवलंबून असणाऱ्या गोदाकाठच्या नगर जिल्ह्यातील गावांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. काही प्रमाणात विसर्ग झाल्याने या गावांमध्ये शेतीला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या दीड ते पावणेदोन महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात आदिवासी पट्ट्यात सुरगाा, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. उर्वरीत तालुक्यांमध्येही जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर आणखी जोरदार पावसाची आशा पुढील टप्प्यात आहे.
e
पिके ———-पेरण्या (टक्क्यांमध्ये)
भात – ४३
ज्वारी – २२
बाजरी – ५७
रागी – १९
मका – ११०
तूर – ३६
मूग – ११२
उडीद – १८
भुईमूग – १४
तीळ १४
कारळ – २
सूर्यफुल – ०
सोयाबीन – १३०
ऊस – ७
कापूस – ६७