नेमकं काय घडलं?
सावली तालुक्यातील पालेबारसा येथे सध्या बिबट व वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी ‘ऑरेंज अलर्ट’ होता. त्यामुळे पावसाची संततधार सुरू होती. पावसात पालेबरसा गावात दुपारी बारा वाजताच्या सुमारास बिबट पाळीव जनावरांची शिकार करण्याच्या उद्देशाने माधव मेश्राम यांच्या घरात शिरला. त्यावेळी ते नातवंडांसह जेवण करीत होती. त्यांना बिबट दिसल्याने त्यांनी आरडओरड केली. माधव मेश्राम व शेजारी नेताजी कावळे यांनी हातात काठी घेऊन बिबट्याला हुसकून लावण्याचा प्रयत्न करीत असताना बिबट्याने नेताजी कावळे यांच्यावर हल्ला केला. वडिलांवर हल्ला होत असल्याचे बघून मुलगा लेश कावळे मदतीला धावला. बिबट्याने त्यालाही जखमी केले. त्यानंतर विजय ठाकरे यालाही किरकोळ जखमी केले. मात्र जखमी अवस्थेत त्यांनी घरात घुसलेल्या बिबट्याला घरातच कोंडून ठेवले. ग्रामस्थांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच तातडीने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस व वनविभागाची गावात चमू तैनात करण्यात आली. मात्र पावसामुळे व्यत्यय आला. वनविभागाची चमू बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र तो पिंजऱ्यात येत नसल्याने वनविभागाने घराभोवती जाळी लावली आहे. वृत्तलिहेपर्यंत मोहीम सुरू होती.
गावात भीतीचे वातावरण
पालेबारसा गाव जंगलालगत आहे. त्यामुळे गावात रात्री वन्यप्राणी येतात. आता तर दिवसाही बिबट आला आहे. या घटनेने गावात दहशत पसरली आहे. घटनास्थळी कॅमेरे लावण्यात आले आहेत. पिंजरादेखील लावण्यात आला आहेत. अलीकडेच नागभीडजवळील सावंगी (बडगे) गावात २४ जुलैला रात्री विवट्याने सचिन रणदे यांच्या घरालगतच्या गोठ्यात घुसून शेळीला ठार केले. आरडाओरड केल्याने बिबट्याने गोठ्याच्या लादणीवर ठाण मांडले. सुमारे सहा तासाच्या थरारानंतर बिबट्याने कवेलू काढले आणि वनाधिकारी व स्वाब संस्थेच्या चमुला चकमा देत जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याची घटना घडली होती.