काय आहे प्रकरण?
पत्नी जयश्री ही विवाहापूर्वी वर्धा येथे कॅटरिंगचा व्यवसाय असलेल्या सूरज रोहणकर याच्याकडे कामाला होती. त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. मात्र जयश्रीचा विवाह राजूरवाडी येथील प्रभाकर मारवाडी यांच्यासोबत झाला. त्यांना दोन मुले झाली. मात्र सूरजबरोबर तिचे असलेले संबंध विवाहानंतरही कायम होते. माहेरी वर्धेला गेल्यावर ते भेटत असे. नंतर सूरज हा तिच्या घरी प्रभाकर कामावर गेल्यावर येत असे. आपला दूरचा भाऊ असल्याचे जयश्रीने सांगितल्याने तिची दोन्ही मुले त्याला मामा म्हणत असे. त्यांच्या संबंधावर प्रभाकरला संशय आल्याने त्याने जयश्रीला एक-दोन वेळा खडसावून सूरजला घरी येण्यास बंदी केली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या जयश्री व तिचा प्रियकर सूरजने प्रभाकरचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. शुक्रवारी पहाटे प्रभाकर घरी झोपला असताना तिने घराचे दार उघडून सूरजला घरात घेतले. दोघांनी झोपलेल्या प्रभाकरचा गळा दाबून खून केला. त्यावेळी काही अंतरावरच पांघरून घेऊन तिची दोन्ही मुले झोपली होती. प्रभाकरचा खून केल्यावर दोघांनी त्याचा मृतदेह दुचाकीवर नेऊन गावाबाहेर एका शेतीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला फेकला. शुक्रवारी सकाळी काही ग्रामस्थांना प्रभाकरचा मृतदेह दिसल्यावर त्यांनी घाटंजी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता सुरुवातीला अपघात झाला असे पोलिसांना व गावकऱ्यांना वाटले. चौकशी सुरूच असताना प्रभाकरचा भाऊ सुधाकर मारवाडी यांनी जयश्री व तिचा प्रियकर यांच्यावर संशय व्यक्त केला. तशी तक्रार दाखल केली. अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले. घाटंजी पोलिसांनी जयश्री व तिचा प्रियकर सुरज याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला दोघेही काहीच बोलत नव्हते. पोलिसांनी खडसावल्यावर जयश्री व सूरज यांनी प्रेमात अडसड ठरत असल्याने प्रभाकरची हत्या केल्याची कबुली दिली. दोघांवर गुन्हे नोंदवून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
घाबरलेल्या मुलांनी केला झोपेचा देखावा
जयश्रीला दोन मुले आहे. एक आठ वर्षांचा तर दुसरा सहा वर्षांचा आहे. जयश्री व सूरजने प्रभाकरची हत्या केली तेव्हा दोन्ही मुले झोपून होती. आवाजामुळे दोघेही जागे झाले. पण घाबरून ते उठले नाही. दोघेही घाबरून पांघरुणात झोपेत असल्याचे दर्शवित कानोसा घेत होती. पोलिसांनी मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सर्व घटनाक्रम रडत रडत खाणाखुणा करून पोलिसांना समजेल असे सांगितले. त्यानतंर पोलिसांनी त्यांच्या आईला व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले.