दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यातून मुळा मुठेद्वारे भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. हा पाण्याचा विसर्ग उजनी धरणात जातो. शनिवारी दौंड तालुक्यामध्ये अचानक एक मोठी मगर भीमा नदीच्या पात्रात दिसून आली आणि शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. दौंड तालुक्यातील आलेगाव ते देऊळगाव राजे या दोन्ही गावाच्या मध्यभागी काही शेतकऱ्यांना शनिवारी भली मोठी मगर दिसून आली. ही मगरच आहे का? हे पाहण्यासाठी लोकांना पाण्यात दगड भिरकावला. त्याच वेळी मगरीने तेथून पळ काढला.
मागे करमाळ्यात मगर पकडली होती
आता प्रश्न हा पडतो ही मगर आली कुठून आणि ही मगर जाणार कोठे? कारण भीमा नदीचे पाणी उजनीत जाऊन मिसळते. गेल्या पाच वर्षांपूर्वी उजनी धरणामध्ये मगर असल्याचे मच्छीमारांना दिसले. सुरुवातीला या अफवा असाव्यात असाही संशय व्यक्त करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात खरोखरच दोन ठिकाणी आढळल्याने मगर पकडण्यासाठीची यंत्रणा मागवण्यात आली आणि करमाळा तालुक्यातील कंदर येथे आणि उजनीच्या भीमा व्यवस्थापन विभागाच्या मत्स्यबीज केंद्रात एक मगर पकडण्यात आली.
मगर उजनीत जाणार की दौंडला भीती दाखवणार? शेतकरी भयभीत, मच्छिमार चिंतेत
दिसलेली मगर ही भीमा नदी काठावर थांबणार की, उजनीत जाणार याचीच सध्या चर्चा सुरू आहे. मात्र जर ती भीमा नदी काठावरच दहशत माजवत राहिली तर काय करायचे? असा प्रश्न स्थानिक मच्छीमारांमध्ये आहे. दुसरीकडे ती उजनीत आली तर काय? असा प्रश्न उजनीकाठच्या मच्छीमारांमध्ये आहे.