चंदगड तालुक्यातील कोवाड गावची पाहणी
२०१९ आणि २०२१ नंतर यंदा देखील कोल्हापूर जिल्ह्याला महापुराला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीच्या वरून वाहत असून शहरी भागासह ग्रामीण भागात देखील पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरत आहे. यामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरचा दुर्गम भाग असलेल्या चंदगड तालुक्यातील कोवाड गावची पाहणी केली. यावेळी ताम्रपर्णी नदीतील गाळ न काढल्याने २०१९, २०२१ आणि आता २०२४ ला या नदीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत शिरत असून मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले.
पुलासंदर्भातील मुद्दा लोकसभेत उपस्थित करणार
यावेळी खासदार शाहू महाराजांनी माध्यमांशी संवाद साधताना, नागरिकांनी सांगितलेल्या तक्रारीनुसार या नदीवरील पुलाची उंची वाढवणे आणि नदीतील गाळ काढण्यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे म्हणाले. तसेच नदीच्या पात्रात होत असलेले अतिक्रमण त्वरित काढले पाहिजे आणि अतिक्रमण करण्यापासून रोखलं पाहिजे, यासंदर्भात लोकसभेत देखील मुद्दा उपस्थित करणार असल्याचे खासदार शाहू महाराज यावेळी म्हणाले.
लाडक्या पूरग्रस्तांकडे सरकारने लक्ष द्यावे
आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटक सरकारला विनंती करून अलमट्टी धरणातून ३ लाख २५ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्याबाबत सांगितले. यासोबतच हिडकल धरणातून देखील पाण्याचा मोठा विसर्ग सुरू केला असल्याने कोल्हापूरचे महापुराचे संकट कमी होत आहे. याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
आजरा तालुक्यात केवळ ३०% पंचनामे झाले आहेत. अद्याप ७०% पंचनामे शिल्लक आहेत. प्रशासन कोणत्या कामात व्यस्त आहे हे मला माहित नाही. लाडकी बहीण योजना प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. मात्र लाडक्या पूरग्रस्तांकडेही सरकारने लक्षात द्यावे आणि नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे शासनाचे पहिले कर्तव्य असायला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी शासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली. कागदी घोडे नाचवण्याऐवजी सरळ हाताने शासनाने मदत दिली पाहिजे, असेही त्यांनी ठणकावले.