नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील पांडव पुलाला देखील पूर आला आहे. या पुरामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. गजानन बनसोडे हा दुचाकी घेऊन पुलावरून जात होता. यावेळी तिथे असलेल्या नागरिकांनी त्याला पुलावरुन जाण्यास मज्जाव केला, पण त्याने कोणाचंही ऐकलं नाही आणि त्याने पुलावरून जाण्याचं धाडस केलं.
पुलाच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत गेल्यानंतर पाण्याच्या प्रवाह वाढला आणि त्याचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं. काही वेळातच दुचाकी पुराच्या पाण्यातून वाहून गेली. पण, सुदैवाने तो बचावला. या घटनेचा व्हिडिओ तिथे उपस्थित काही नागरिकांनी केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, काही तरुणांकडून स्टंटबाजी देखील केली जातं असल्याच समोर येतं आहे. काही दिवसांपूर्वी देगलूरमध्ये असाच प्रकार पहावयास मिळाला. पुराच्या पाण्यातून जाण्याचं धाडस करू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केलं जातं आहे.
विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला
नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प ९३ टक्के भरल्याने आज प्रकल्पाचा पुन्हा एक दरवाजा घडण्यात आला. रविवारी दुपारी ८ नंबरचा गेट उघडण्यात आला. १५,२९७ क्यूसेस प्रति सेकंदाने पाणी गोदावरी नदीत विसर्ग करण्यात आला. नांदेडमध्ये जोरदार पाऊस नसला तरी विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील भागातून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरु आहे. तीन दिवसांपूर्वी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून ३५१ क्युमेक प्रती सेकंदाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.