झाड अंगावर कोसळलं, आनंदी कुटुंबावर काळाचा घाला
अंगावर झाड पडून जखमी झालेले पंकज गुप्ता हे मूळ उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथील रहिवासी आहेत. मागील २० वर्षांपासून ते नांदेड शहरातील बाबानगर भागात आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. पाणीपुरीचा व्यवसाय करुन ते उदरनिर्वाह करतात. रविवारी सकाळी पंकज गुप्ता हे पत्नी पूजा आणि मुलगा यश यांच्यासोबत डीमार्टला खरेदीसाठी गेले होते. परत स्कुटीवरुन घराकडे येताना स्नेह नगर मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेलं झाड त्यांच्या अंगावर, स्कूटीवर कोसळलं.
त्यांचा ११ वर्षीय मुलगा स्कुटीवर आई-वडील दोघांच्या मध्ये बसलेला होता. अंगावर झाडं कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला होता. शिवाय त्याच्या आई – वडिलांनाही दुखापत झाली. विशेष म्हणजे वारा किंवा मोठा पाऊस नसताना देखील झाड कोसळलं. दरम्यान, अंगावर झाड पडल्यानंतर मुलाला झाडाखालून काढून रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना मुलाचा मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला होता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नंतर कोसळलेलं झाड कापून हटवलं. महापालिकेने १५ वर्षांपूर्वी शहरात झाडं लावली होती. आज या झाडाची वाढ झाली मात्र अनेक झाडं वाकलेल्या अवस्थेत आहेत.
माझ्या मुलाला वाचवा, आईने फोडला टाहो
कुटुंब खरेदी करुन घराकडे आनंदात येत होतं. रस्त्यात एक झाड त्यांच्यावर काळ होऊन झडप घालेल अशी कल्पनाही त्यांना नसेल. दुचाकीवर झाडं कोसळ्याने आई, वडील आणि चिमुकला हे कुटुंबातील तिघेही झाडाखाली दबले गेले. आईही झाडाखाली दबलेली असताना ती तीच्या वेदना विसरुन माझ्या मुलाला वाचवा हो..असा टाहो फोडत होती. हा तिचा आक्रोश अंगावर काटा आणणारा होता. रस्त्यावरील नागरिकही तातडीने मदतीसाठी धावले. शंभरच्यावर नागरिकांनी मिळून झाडाला काही मिनिटात बाजूला केलं. तातडीने एका खासगी वाहनाने मुलाला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण दुर्दैवाने त्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.