कल्याण डोंबिवलीमधील निर्भय जर्नलिस्ट फॉऊंडेशन या पत्रकार संघटनेने मनसे आमदार राजू पाटील यांच्याशी वार्तालाप केला. यावेळी विविध विषयावर राजू पाटील यांनी मते मांडली. यावेळी पत्रकारांनी ‘मातोश्री’वरील अबू आजमी यांच्या स्वागतावर प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी संताप व्यक्त केला.
अबू आजमी यांचे मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या फोटो समोर स्वागत केल्यावर यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा ठेवायची? यांना फक्त खुर्च्या दिसतात. महाराष्ट्र द्वेषी अबू आजमी, बाळासाहेबांच्या फोटोसमोर त्यांना बुके देताय, लाजा वाटल्या पाहिजेत. त्यांच्यावरती कोणी बोलत नाही. आम्ही जरा कोणाला मदत केली तर आम्हाला विचारायचं, असे राजू पाटील म्हणाले.
आम्ही आमचा हिंदुत्वाचा मुद्दा आणि मराठीबाणा कधी सोडला नाही आणि कधी सोडणारही नाही. लोकसभेत यांच्या तोंडाला रक्त लागलेला आहे. त्यामुळे ते अबू आजमी सारखे अनेक लोक जवळ करतात. याचे परिणाम भविष्यात चांगले होणार नाही. लोकांनी रागामध्ये भाजप विरोधात मतदान केलेले आहे. मात्र काही जागेवरती पाच पाच विधानसभेत लोक यांच्या विरोधात होते. मालेगावमध्ये देखील असाच प्रकार झाला. तुम्ही अशा प्रकारे पक्ष चालवत असेल तर राज ठाकरे ज्या पद्धतीने पक्ष चालवतात, त्यात आम्ही समाधानी आहोत, असे राजू पाटील म्हणाले.
सपा खासदारांचा मातोश्रीकडून पाहुणचार
उत्तर प्रदेशातील दणदणीत विजयानंतर समाजवादी पक्षाचे खासदार मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे कुटुंबियांनी मातोश्रीवर त्यांचा खास पाहुणचार केला. समाजवादी पक्षाच्या खासदारांमध्ये आणि ठाकरेंमध्ये निवडणूक काळातील घडामोडींवर विशेष चर्चा झाली. उत्तर प्रदेशातील खासदारांबरोबरच आमदार अबू आजमी, आमदार रईस शेख यांनीही ठाकरे यांची भेट घेतली.