खेडकरांचा नवा करिष्मा; १४ वर्षांपूर्वी घेतलेल्या बारामतीतील जमिनीच्या सातबारावरील नाव बदललं

बारामती: आयएएस पूजा खेडकर प्रकरणात जेव्हा संपत्तीचा मुद्दा आला, तेव्हा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक ट्विट करत खेडकर कुटुंबाचे बारामती कनेक्शन उघड केले होते. त्यामध्ये बारामती तालुक्यातील वाघळवाडीतील एका शेत जमिनीचा उल्लेख होता. मात्र, अचानक दोन दिवसांपूर्वी या शेतजमिनीच्या मालकाचे नाव बदलण्यात आले आहे. या संदर्भात संभ्रम निर्माण झाला असून, संशयाच्या फेऱ्यात ही नोंद सापडली आहे.

सातबाऱ्यावरील नाव बदललं

खेडकर कुटुंब सातत्याने नवनव्या वादात सापडत आहे. विजय कुंभार यांनी ट्विट करत बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील गेट नंबर आठ मधील १४ गुंठे जमीन ही दिलीप खेडकर यांची असल्याचे नमूद केले होते. यामध्ये दिलीप धोंडिबा खेडकर यांच्या नावाने १४ गुंठे जमीन असल्याचा सातबारा देखील प्रसिद्ध केला होता. यावरून राज्यभरात बरीच चर्चा देखील झाली, मात्र आता अचानक २७ जुलै रोजी या सातबारातील दिलीप धोंडिबा खेडकर या नावाचे ‘स्पेलिंग’ दुरुस्त करण्यात आले आहे. या दिलीप धोंडिबा खेडकर ऐवजी दिलीप कोंडिबा खेडकर असे नाव यात १४ गुंठे जमिनीसाठी नव्याने नोंदणी करण्यात आले आहे.
Pooja Khedkar: खेडकर कुटुंबाचा पाय आणखी खोलात, पूजा खेडकरच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालाच नाही, आरक्षणासाठी कट?

नावातील बदलामुळे संभ्रम

बारामती तालुक्यातील वाघळवाडीतील जमिनीबाबत दिलीप खेडकर यांनी केलेल्या या बदलामुळे नक्की दिलीप खेडकर कोण? असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. दिलीप कोंडिबा खेडकर की दिलीप धोंडिबा खेडकर या दोन नावांमुळे नवीन संभ्रम निर्माण होऊ शकतो. जर जमीन खरोखरच दिलीप कोंडिबा खेडकर यांची असेल, तर ही जमीन खरोखरच त्याच खेडकर कुटुंबाची आहे की अन्य कुटुंबाची? हा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण केला आहे.

दरम्यान, स्थानिक ठिकाणच्या माहितीनुसार, ही जमीन १४ वर्षांपूर्वी दिलीप धोंडिबा खेडकर यांनीच खरेदी केली होती. मात्र, आता अचानक यात नावात बदल करण्याचे कारण काय? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. जेव्हा खेडकरांच्या बेहिशेबी संपत्तीची चर्चा सुरू झालेली आहे, त्यावेळेस नावातील बदलाची चर्चा देखील होत आहे.

Source link

dilip khedkarias pooja khedkarmanorama khedkarpooja khedkar caseupsc puneपुणे न्यूजपूजा खेडकरपूजा खेडकर आई-वडीलपूजा खेडकर कुटुंबपूजा खेडकर बातमी
Comments (0)
Add Comment