पर्यटनासाठी तरुणांची गर्दी, दाट धुकं अन् रस्ता दिसेनासा
सध्या पावसाळ्याचे दिवस असून अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अनेक ठिकाणी फेसाळणारे धबधबे, उंचावरती असलेले धुक्याचे वातावरण व निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देण्यासाठी गुजरात राज्यातील डेडियापाडा, राजपिपला, बरोडा, अहमदाबाद येथून तरुण पर्यटक मौज मजा करण्यासाठी दरवर्षी येत असतात. या वर्षी देखील दमदार पावसाला सुरुवात झालेली असून होराफळी, डनेल, मोगरा या भागात निसर्गरम्य वातावरणात फिरण्यासाठी शेकडोंच्या संख्येने तरुण मंडळी हजेरी लावत आहेत. या भागातील रस्ते वळणावळणाचे आणि जास्त उंची वरचे असल्याने या परिसरात दाट धुके पसरलेले असते. यात समोरची वाहन देखील आणि रस्ते देखील वेळप्रसंगी दिसत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडून येत असतात.
गुजरातमधील तीन तरुणांच्या गाडीला अपघात
अशाच प्रकारे पर्यटनासाठी आलेले गुजरात राज्यातील तीन तरुण त्यांच्या थार या वाहनाने प्रवास करत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यांची थार गाडी ही थेट खोल दरीत जाऊन कोसळली. या भीषण दुर्घटनेत एक जण जखमी झाल्याची झाला आहे. तर थार गाडीचंही मोठं नुकसान झालं आहे. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून जखमीला पुढील उपचारासाठी गुजरात राज्यात घेऊन गेले असल्याचे माहिती मिळाली आहे.
यावेळी गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येते. तरुणांचा अति उत्साह अशा प्रकारे जीवावर बेतू शकतो. त्यामुळे येथे येणाऱ्या तरुणांनी काळजीपूर्वक वाहन चालवणे गरजेचे आहे, असं आवाहन करण्यात आलं आहे..