नेमकं काय घडलं?
मुंबई उपनगरांना लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील विरार शहरातील नवापूर परिसरात असलेल्या सेवेन सी बीच रिसॉर्ट येथे मिलिंद मोरे हे आपल्या कुटुंब आणि मित्रांसह रविवारी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी मिलिंद मोरे यांच्या पुतण्याला रिक्षा चालकाने धक्का दिला. यामुळे रिक्षा चालकासोबत मिलिंद मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची बाचाबाची व वादावादी झाली.
रिक्षा चालकाकडून साथीदारांसह मारहाण
वादावादीनंतर रिक्षावाला रागाच्या भरात गावात गेला आणि आपल्या साथीदारांना घेऊन वादावादी झालेल्या ठिकाणी परत आला. त्यानंतर रिक्षा चालकाने आपल्या आठ ते दहा साथीदारांसह मिलिंद मोरे, त्यांचा भाऊ आणि सोबत असलेल्या दोघा मित्रांवर जोरदार हल्ला केला आणि बेदम मारहाण केली.
मारहाणीनंतर जागीच कोसळले
या मारहाणीत मिलिंद मोरे यांना दुखापत झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते त्याच ठिकाणी खाली कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले. रिसॉर्ट समोर झालेल्या या हल्ल्याची व मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
आरोपी फरार, शोध सुरु
या घटनेत मृत्युमुखी पडलेले मिलिंद मोरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे उपशहर प्रमुख असून ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र आहेत. या प्रकरणी रिक्षा चालक व त्याच्या अन्य साथीदारांविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे यांच्यावर हल्ला करणारे रिक्षा चालक व हल्लेखोर अन्य साथीदार फरार असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.