झिरवळांच्या मनात काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र इतक्या महत्त्वाच्या बैठकीला नरहरी झिरवळ अनुपस्थित होते.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा नुकताच नाशिकमध्ये निष्ठावान संवाद मेळावा झाला. या मेळाव्याला झिरवळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवळ हजर होते. माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा शरद पवारांबरोबर राहण्याची असल्याचं गोकुळ म्हणाले होते. त्यामुळे नरहरी झिरवळ काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
चेतन तुपे-शरद पवार एकाच मंचावर
वानवडी येथील महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवन येथे सातारा जिल्हा मित्र मंडळाचा सुवर्णमहोत्सव आणि स्नेहमेळाव्यासाठी शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी स्थानिक आमदार चेतन तुपे व्यासपीठावर आल्याने ते शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’त जाणार का, या चर्चेने उचल खाल्ली. मात्र, या दोघांत कसलाही संवाद पाहायला मिळाला नाही.
सातारा जिल्हा मित्र मंडळाचा कार्यक्रम राजकीय नव्हता. कार्यक्रम माझ्या मतदारसंघात असल्याने मला स्थानिक आमदार म्हणून निमंत्रण होते. आयोजकांशी स्नेह असल्याने मी कार्यक्रमाला उपस्थित होतो, असं तुपे म्हणाले.
नवघरेंच्या प्रोफाईलवर घड्याळ गायब
दुसरीकडे, हिंगोलीतील वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलेलं ‘घड्याळ’ हटवलं आहे. त्याबाबत कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे विचारणाही सुरु केली आहे. त्यामुळे नवघरे ही शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.