मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही
नरहरी झिरवाळ म्हणाले की, ” गोकुळ हा माझा मुलगा आहे. मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही, गोकुळ अजून आज्ञाधारक आहे. तो माझ्या शब्दाच्या पुढे नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. नंतर पत्रकारांनी गोकुळ हे शरद पवारांच्या व्यासपीठावर गेले होते असा प्रश्न विचारला त्यावर नरहरी झिरवाळ म्हणाले की, ”गोकुळ फक्त सत्कार करण्यासाठी गेला होता. त्याने त्याची उमेदवारी जाहीर केली. परंतु मी त्यांची समजूत घातली आहे. तो माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही.
नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ हे काही दिवसांपूर्वी नाशिक येथे झालेल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झाले होते. गोकुळ झिरवाळ उपस्थित राहिल्यामुळे अजित पवार गटातील कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी ”माझी छाती जरी फाडली तरी शरद पवार दिसतील” असं विधान केलं होतं. त्यामुळे मुलापाठोपाठ नरहरी झिरवाळ सुद्धा शरद पवार गटात जाणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. परंतु आता गोकुळ यांचे वडील नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता गोकुळ झिरवाळ काय भूमिका घेतायं? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
मी अजित दादांबरोबरच राहणार
नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की , ”मी अजित पवारांसोबतच राहणार आहे. पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा सुद्धा मी तेथे हजर होतो. माझ्या मुलाने काहीही सांगितलं तरी मी अजित दादांबरोबरच राहणार आहे”.