नागपूर रेल्वे स्थानकात काय घडलं?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल साऊथ इंडियन इंटरलिंकिंग असोसिएशनचे अध्यक्ष अय्या कन्नु यांच्यासह पन्नास ते ६० कार्यकर्ते रविवारी जीटी एक्सप्रेसने दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी चेन्नईवरून निघाले होते. मात्र मध्यप्रदेश पोलिसांनी भोपाळजवळ नर्मदापूर येथे त्यांना खाली उतरवलं आणि चेन्नई एक्सप्रेसला वेगळा कोच जोडून त्या गाडीने त्यांना चेन्नईकडे परत पाठवलं. आम्हाला मध्येच उतरवून परत पाठवलं, तर आमच्या भोजन आणि पाण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनानेच करायला हवी असं, या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं.
सकाळी ९.२० वाजता ही गाडी नागपूर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पोहचली असता त्यांनी प्लॅटफॉर्मवर गोंधळ घातला आणि गाडी रोखून धरली. काहीजण गाडीच्या इंजिनवर चढले, त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र हे सर्वच जण तमिळमध्ये बोलत होते. त्यामुळे त्यांची मागणी काय आहे हे कुणाला कळत नव्हतं. यातील काहीजण गाडीच्या इंजिनवर चढून तमिळमध्ये घोषणा देऊ लागले.
लोहमार्ग पोलीस तसंच आरपीएफ त्यांना शांत करण्यचा प्रयत्न ते करत होते, मात्र भाषेच्या अडचणीमुळे त्यांच्याशी संवाद साधता येत नव्हता. त्यामुळे तमिळ भाषा येणाऱ्या लोहमार्ग पोलिसमधील शिपायाला बोलावून त्याला आंदोलकांशी बोलायला सांगितलं. त्यानंतर त्यांना अन्नाची पाकिटं आणि पाण्याच्या बाटल्या देऊन पुढे रवाना करण्यात आलं.
ज्या कोचमध्ये हे कार्यकर्ते होते त्या कोचमध्ये नर्मदापूरवरून आरपीएफचे जवानही नागपूरपर्यंत आले होते. नागपूरवरून ही गाडी पुढे रवाना झाली, त्यावेळी पुढील स्थानकापर्यंत नागपूर आरपीएफचे जवान त्या कोचमध्ये तैनात करण्यात आले होते. मात्र मेल एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर रोखून धरल्याने मोठा गोंधळ उडाला होता. रेल्वेकडून पाणी आणि जेवण न मिळाल्याने त्यांनी निषेध व्यक्त करत नागपूर रेल्वे स्थानकात आंदोलन केल्याने एकच गोंधळ उडाला होता.