रस्ता नसल्याने येथील रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. सोमवारी गरोदर महिलेच्या पोटात दुखायला लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करायचं होतं. मात्र रस्ता नसल्याने पुराच्या पाण्यातून चादरीची झोळी बनवत तिला रुग्णालयापर्यंत नेण्यात आलं.
रस्त्या नसल्याने नदीतून जीवघेणा प्रवास
अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी, बारीपाडा गावाचा रस्ता नदीतून जातो. रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून घेऊन जाण्यात आलं. सुमित्रा विरसिंग वसावे (वय २९ वर्ष) या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने तिला झोळी करून प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळखुटा इथे दाखल करण्यात आलं. अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावातून मुख्य रस्तापासून ते बारीपाडा, पाटीलपाडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. सदर पाडयात जाण्या-येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
या पाडयामध्ये जाताना रस्त्यात मोठी दरी आहे आणि नदी नाल्यामधून जावं लागतं. तसंच पावसाळयाच्या दिवसात चार महिने या पाड्याचा इतर भागाशी संपर्क तुटतो. तसंच बारीपाडा आणि पाटीलपाडा येथील लोकसंख्या सहाशेच्या जवळपास असून पावसाळयात रूग्णांना, गरोदर मातांना तसंच शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून एकमेकांचा आधार घेत नदी पार करावी लागते. हा नदीतील प्रवास जीवघेणा, जिकरीचा आणि त्रासदायक ठरतो. त्यामुळे या पाडयांमध्ये रस्त्याची अत्यंत आवश्यकता असताना शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झालं आहे.
याबाबत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वेहगी गावाच्या मुख्यरस्त्यापासून ते पाटीलपाडा, बारीपाडा असा सहा किमीचा रस्ता आणि त्यावर येत असलेले पूल बांधावे. तसंच परीसरातील पाडयातील जनतेची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात यावी याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करूनही हा भाग वर्षानुवर्षे विकासापासून वंचित आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याचं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यातून प्रवास
अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी बारीपाडा येथील सुमित्रा विरसिंग वसावे (वय २९ वर्ष) या गर्भवती महिलेला आज २९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता त्रास होऊ लागल्याने घरच्यांनी तिला उपचारासाठी झोळी करून रुग्णालयात नेलं. दरम्यान गावाच्या दोन्ही बाजूस नदी असल्याने या गर्भवती महिलेला झोळीत टाकून पुराच्या पाण्यात प्रवास करावा लागला. त्यानंतर तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळखुटा येथे दाखल करण्यात आलं.