KYC Fraud: ‘केवायसी’ने केले कर्जबाजारी; माटुंग्यातील इस्टेट एजंटसोबत मोठा स्कॅम, काय घडलं?

मुंबई : माटुंगा येथील एका रिअल इस्टेट एजंटला बँकेच्या तोतया अधिकाऱ्याने ‘केवायसी अपडेट’चा फोन करत कर्जबाजारी केले. लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडत मोबाइलचा ताबा घेत या कथित बँक अधिकाऱ्याने एजंटच्या क्रेडिट कार्डवर परस्पर दहा लाखांचे कर्ज घेतले आणि त्यातील सात लाखांची रक्कम काढून घेतली. एजंटने फसवणुकीची तक्रार केल्यानंतर माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

माटुंग्याच्या इस्टेट एजंटला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने बँकेतून बोलत असल्याचे भासवून तुमच्या खात्याची केवायसी अपडेट नसून लवकरात लवकर अपडेट न केल्यास खाते बंद करण्यात येईल, असे सांगितले. त्यावर एजंटने बँकेत जाऊन केवायसी अपडेट करून घेतो, असे सांगितले. मात्र बँकेत जाऊन नाही तर ऑनलाइनच करावे लागेल, असे सांगून तोतया अधिकाऱ्याने एक लिंक पाठवली.

सुरुवातीला एजंटने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही मात्र खाते बंद होईल, या भीतीने लिंकवर क्लिक केले. लिंकवर क्लिक करताच त्याच्या मोबाइलचा ताबा बँक अधिकारी भासविणाऱ्या व्यक्तीकडे गेला. त्याने प्रथम एजंटच्या मोबाइल क्रमांकावर येणारे संदेश आणि फोन आपल्या क्रमांकावर वळविले. त्यानंतर केवायसीच्या बहाण्याने एजंटकडून सर्व वैयक्तिक माहिती, बँक तसेच कार्डचा तपशील घेतला. अपडेट करण्यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड क्रमांकही घेतले. त्यानंतर तोतया अधिकाऱ्याने एजंटच्या क्रेडिट कार्डवरून ऑनलाइन कर्ज घेतले आणि बचत खात्यामध्ये वळविले.

SBI Reward Point Scam :लोभाला बळी पडाल तर बँक खाते होईल साफ; जाणून घ्या सेफ्टी टिप्स
हा प्रकार होऊनही फसवणूक झाल्याचे लक्षात आले नाही. मात्र बराच उशीर कुणाचा फोन येत नसल्याने एजंटने दुसऱ्या एका क्रमांकावर आपल्या मोबाइलवर फोन केला त्यावेळी फोन इतरत्र वळविण्यात आल्याचे त्याच्या लक्षात आले. हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचा संशय आल्याने एजंटने बँक खाते तपासले. त्यावेळी दहा लाख कर्ज घेऊन त्यातील सुमारे सात लाख रुपये वेगवेगळ्या खात्यावर पाठविण्यात आल्याचे दिसून आले. एजंटने त्वरित याबाबत माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार केली. बँक खाती, मोबाइल क्रमांक तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Source link

adhar card updatekyc fraud casekyc scammatunga estate agentpan card updateमुंबई फसवणूकमुंबई बातम्या
Comments (0)
Add Comment