काय आहे प्रकरण?
उरणमधील तरुणीच्या हत्या प्रकरणात दोन तीन संशयित आरोपी होते, नवी मुंबई आणि कर्नाटकात पोलिसांची पथकं शोध घेत होते. आज सकाळी मुख्य आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेतलं. घटनेनंतर त्याचं लोकेशन सापडत नव्हतं, मात्र तो कर्नाटकचा असल्याची माहिती मिळाली होती. त्याच्या मित्रांनी माहिती दिल्यानंतर यादगीर या गावातून पहाटे त्याला ताब्यात घेतलं असून त्याने हत्येची कबुली दिली आहे, असं अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितलं.
सूडबुद्धीचा संशय
मोहसीन हा मयत तरुणीच्या संपर्कात होता, त्याच्याकडे चौकशी करत होतो, मात्र तो आरोपी नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं. मयत तरुणी आणि आरोपी यांच्यात मैत्री होती, परंतु गेली तीन-चार वर्ष ती त्याच्या संपर्कात नव्हती. त्यातून आरोपीने हत्या केल्याचा संशय आहे. २०१९ मध्ये पॉक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याच्याशी हत्येचा संबंध आहे का? असा प्रश्न विचारला असता, संपूर्ण चौकशी झाली नाही, त्यामुळे इतक्यात सांगणं चुकीचं ठरेल. पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाले नाहीत, तिच्या शरीरावर भोसकल्याच्या खुणा आहेत, मात्र चेहऱ्यावरील जखमा या कुत्र्याच्या चाव्याने झाल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ठरवून भेटले
घटनास्थळाच्या जवळपास त्यांचं एकमेकांना भेटायचं ठरलं होतं, ते ठरवून भेटायला गेले होते, हे काही अपहरणाचं प्रकरण नाही. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला असावा, असं पोलीस म्हणाले. ते एका गावात जवळपास राहायचे, तिथेच शिकत होते. २५ तारखेला तरुणी हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसात दाखल केली होती, २६ तारखेला संध्याकाळी तिचा मृतदेह सापडला, परंतु गुरुवारपासूनच आम्ही आरोपीच्या मागावर होतो, असं पोलिसांनी सांगितलं.