वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैपासून मुंबई, चैत्यभूमी येथून सुरू झाली. आरक्षण बचाव यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. यात्रा लातूर येथे मुक्कामी होती. मंगळवारी यात्रा ज्यावेळी मार्गस्थ झाली तेव्हा नवनिर्वाचित विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आंबेडकरांचे स्वागत केले. पंकजा मुंडे यांना आंबेडकर यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी पत्र लिहिले होते.
नामानंद महाराज संस्था, ता. जि. लातूर येथे परमभागवत ब्रह्मश्री श्री वेदनंद महाराज समाधी या ठिकाणी विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे यांनी आरक्षण बचाव यात्रेचे स्वागत केले. गोपीनाथ मुंडे यांनीही पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन मंडल आयोगाच्या समर्थन मोर्चात बाळासाहेब आंबेडकरांसोबत सामील झाले होते. आज गतकाळातील आठवणींना उभय नेत्यांच्या भेटीत उजाळा मिळाला.
यावेळी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, ओबीसी नेते रमेश बारस्कर, ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शरद पवार यांची मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावर भूमिका काय?
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका काय? असा प्रश्न वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारला होता. पंकजा मुंडे यांनीही आंबेडकर यांची री ओढत शरद पवार यांनी आरक्षण प्रश्नावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांची आरक्षण प्रश्नावर भूमिका जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असे पंकजा म्हणाल्या.