राज्य पोलिस दलातील विविध घटकांतील भरती प्रक्रिया सुरू असताना अपर पोलिस महासंचालकांनी १६ जुलै रोजी ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गासंदर्भात पत्र जारी केले. त्यानुसार ईडब्ल्यूएस निवड यादीत असलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांची समाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) किंवा इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) निवड करावी, यासंदर्भात लेखी हमीपत्र घेण्याची सूचना करण्यात आली. त्याला नाशिक शहर पोलिस भरतीतील ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातील सहापैकी चार मराठा उमेदवारांनी नकार दिला. हे प्रकरण ‘मटा’ने प्रकाशझोतात आणले. तर, नाशिक पोलिसांनी यासंदर्भात अपर पोलिस महासंचालकांकडे मार्गदर्शन मागविले होते.
त्यानुसार ३० जुलै रोजी महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलिस घटकांना सूचना जारी केल्या आहेत. त्यान्वये, ‘ईडब्ल्यूएस’मधून निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांच्या निवडीसंदर्भात धोरण निश्चितीसाठी पोलिसांनी शासनाला विनंती केली आहे. शासन आदेश प्राप्त होईपर्यंत पोलिस शिपाई भरतीमध्ये ‘ईडब्ल्यूएस’मधून तात्पुरती निवड झालेल्यांची उमेदवारी रद्द न करता प्रकरणे स्थगित ठेवावीत. मात्र, इतर प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी. शासन आदेशानंतर ‘ईडब्ल्यूएस’मधील उमेदवारांच्या निवडीसंदर्भात यथावकाश कळविण्यात येईल, असे अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
अपर पोलिस महासंचालकांच्या पत्रानुसार नाशिक शहर आयुक्तालयाच्या निवड यादीतील ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातील सहा मराठा उमेदवारांना बोलविण्यात आले. त्यापैकी चौघांनी हमीपत्र देण्यास नकार दिला. त्यामध्ये तीन महिलांसह एका माजी सैनिकाचा समावेश आहे. तर नाशिक ग्रामीण पोलिस दलात ‘ईडब्ल्यूएस’मधून एक महिला उमेदवार उत्तीर्ण झाली. दरम्यान, पोलिस भरतीच्या जाहिरातीत मराठा समाजाच्या उमेदवारांनी ‘ईडब्ल्यूएस’मधून अर्ज करू नये, असा उल्लेख नसल्याचा दावा संबंधित उमेदवारांनी केला. तर ‘ईडब्ल्यूएस’पेक्षा ‘एसईबीसी’चा ‘कटऑफ’ नाशिक शहर व ग्रामीणसह इतर पोलिस घटकांतही अधिक आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी हमीपत्र नाकारले आहे.