पश्चिम महाराष्ट्रात सध्या शिंदे शिवसेनेचे पाच आमदार आहेत. यात सातारा जिल्ह्यात मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, कोल्हापूर जिल्ह्यात प्रकाश आबिटकर व राजेंद्र पाटील-यड्रावकर व सोलापूर जिल्ह्यातील शहाजीबापू पाटील यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात सध्या या गटाचा एकही आमदार नाही. या जिल्ह्यातील आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने या गटाचा एक आमदार कमी झाला. यामुळे केवळ पाच आमदार असल्याने हा आकडा वाढविण्यासाठी शिंदे गटाने ‘फिल्डिंग’ लावली आहे.
महायुतीच्या जागा वाटपाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली आहे. यामुळे अधिकाधिक जागा त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेच्या विद्यमान आमदारांच्या जागा या गटाला मिळतील. मात्र, केवळ सहा जागांवर हा गट समाधान मानण्याची शक्यता कमी आहे. यामुळे आणखी पाच ते सहा जागा मिळाव्यात यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
शिंदे गटाकडून चाचपणी सुरू
सध्या असलेल्या जागेपेक्षा प्रत्येक जिल्ह्यात आणखी एक जागा मिळावी, यासाठी शिंदे गट आग्रही राहण्याची शक्यता आहे. यासाठी कोणती जागा मागता येईल, संभाव्य उमेदवार कोण असतील, याची चाचपणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी ताकदीचे उसने उमेदवार घेता येतील का, याबाबतही हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या जागांव्यतिरिक्त कोल्हापूर उत्तर, जत, सोलापूर शहर मध्य, करमाळा, हातकणंगले अशा काही मतदारसंघांत ही चाचपणी सुरू असल्याचे कळते.
शिंदे गटाच्या जागा व संभाव्य उमेदवार
पाटण : शंभूराज देसाई
कोरेगाव : महेश शिंदे
राधानगरी : प्रकाश अबिटकर
शिरोळ : राजेंद्र यड्रावकर
सांगोला : शहाजीबापू पाटील
खानापूर : सुहास बाबर
जत : योगेश जानकर
सोलापूर मध्य : शिवाजी सावंत