२०१९ ला यशश्रीसोबत काय घडलं होतं?
२०१९ मध्ये यशश्री ही केवळ १५ वर्ष ४ महिन्यांची होती, ती इयत्ता ११ वीत विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. महाविद्यालयात जाताना आरोपी ड्रायव्हर दाऊद शेख (२४) हा तिचा पाठलाग करत असे. तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत होता. १४ सप्टेंबर २०१९ रोजी आरोपीने तिला बळजबरी मिठीत घेण्याचा प्रयत्न केला होता. ती ओरडून नये, म्हणून तिचे तोंड दाबले. त्याचवेळी यशश्रीचे वडील तिथून जात होते, त्यांनी लागलीच धाव घेतली. त्यांनी दाऊदला चांगलेच फटकारले.
त्यांना जीवे मारण्याची धमकी देत दाऊदने तिथून पळ काढला. या त्रासाला कंटाळून यशश्रीच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.आरोपीविरोधात पोक्सा कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला या गुन्ह्यात ६ महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. तुरुंगातून सुटून आल्यानंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला. तिथे तो बसचालक म्हणून काम करत होता. त्याने एक ते दोन कंपनी बदलल्या होत्या. पण यशश्रीने उचलेलं पाऊल आणि त्याचा राग मनात धरुन दाऊद यशश्रीचा खून करण्याच्या तयारीत होता असा संशय व्यक्त होतोय.
२५ जुलैला यशश्रीसोबत काय घडलं?
२५ जुलै रोजी यशश्री सकाळी घरुन १० वाजता निघाली. मैत्रिणीच्या घरी जायचे सांगून तीने कार्यालयातून हाफ डे सुट्टी घेतली. सायंकाळी ५ वाजेनंतर तिचा मोबाईल बंद येत असल्याने तिचा शोध सुरू केला होता. मग यशश्रीच्या कुटुंबियांनी तिच्या मैत्रिणीशी संवाद साधला, पण काहीच माहिती मिळेना चौकशीनंतरही मुलीचा पत्ता न लागल्याने कुटुंबियांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं. २६ जुलैची रात्र उलटून गेल्यानंतर म्हणजे २७ जुलै रोजी पहाटे २ दोन वाजता पोलिसांना एक कॉल आला. त्या व्यक्तीने तरुणीचा मृतदेह पडलेला असल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यशश्रीच्या आईवडिलांना बोलवण्यात आले.
त्यांनी कपड्यांवरून तो मृतदेह यशश्रीचाच असल्याचे सांगितले, मग तपासाला वेग आला. यशश्रीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले
त्यात ती दाऊद शेख सोबत बोलत होती, हे समोर आले. त्यानंतर दाऊद शेखच्या नंबरवर पोलिसांनी कॉल केले, पण त्याचा नंबर बंद होता. महत्त्वाची बाब म्हणजे यशश्री शिंदे आणि दाऊद शेख या दोघांचे मोबाईल एकाच वेळी बंद झाल्याचे पोलिसांना समजले, त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते.
घटनेच्या दिवशीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये यशश्री पुढे चालत असताना आणि दाऊद तिचा पाठलाग करत असताना दिसत आहे. याच भागात यशश्रीचा मृतदेह मिळाला होता. दरम्यान याच प्रकरणात दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा असल्याची माहिती पोलिसांना तपासातून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एक पथक कर्नाटकात पाठवले होते. ३० जुलै रोजी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर टेकडी परिसरातून आरोपी दाऊद शेखला अटक केली.
या प्रकरणात पोलीस काय म्हणाले?
दरम्यान,यावर झोन एकचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे म्हणाले, “तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. घटनेपूर्वी दोघांचा एकमेकांशी संपर्क झाला होता. हे दोघे एकाच ठिकाणी राहत होते. तपासात दिसून आले की दोघे एकमेकांना ओळखत होते आणि त्यांनी भेटायचे ठरवले होते. त्यामुळे हे किडनॅपिंगचे प्रकरण नाही. ते भेटले त्याच ठिकाणी त्यांच्यामध्ये वाद झाला आणि तिथेच हत्या झाली असावी. आरोपीने गुन्हा कबुल केला आहे. दरम्यान, यशश्रीच्या शरीरावरील जखमा जीवघेण्या आहेत, पण चेहऱ्यावरील जखमा कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे झाल्या असाव्यात. सोशल मिडियावर व्हायरल होण्याऱ्या पोस्टमध्ये दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या आहेत. हत्येमागे लव्ह ट्रँगल असून लव्ह ‘जिहाद’ नाही.” असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
आरोपीची अजून चौकशी करायची असून मुलीच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आज येईल, असंही पोलिसांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असून त्यानंतर सगळी माहिती स्पष्ट होईल. या प्रकरणानंतर अनेक संघटना, अनेक राजकीय पक्ष आक्रमक झाले असून यशश्रीला न्याय मिळवा, अशी भूमिका मांडताना दिसत आहेत.