रवींद्र वायकर यांचं पत्र आहे तसं
वायकरांनी पत्रात लिहिलंय की, ”उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने आपणास कळवू इच्छितो की, महाराष्ट्र शासनाने देशाची राजधानी दिल्ली येथे उत्कृष्ट असे “महाराष्ट्र सदन” उभारलेलं आहे, यात जवळपास 132 खोल्या आहेत. अधिवेशनाच्या काळात, तसेच अन्य कामानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनता या ठिकाणी वास्तव्यास येत असतात. ‘महाराष्ट्र सदनाची’ वास्तू जरी चांगली असली तरी या सदनामध्ये काही सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. असं वायकर यांनी म्हंटलं आहे.
तक्रारी काय ?
1) महाराष्ट्र सदनात फक्त खासदारांसाठी वेगळा सेल असणे आवश्यक आहे. जेणेकरुन या ठिकणी मा. खासदार तसेच त्यांचे स्वीय सहायक शासकीय पत्र व्यवहारांची कामे करणेसाठी येऊ शकतात, सदनामध्ये असणा-या खासदारांची संख्या व खासदार कक्षात असणारी संगणकांची संख्या ही अपुरी असून, त्यात वाढ करणे, तसेच आधुनिक पध्दतीचे संगणक व प्रिंटरची व्यवस्था करणे आवश्यकता आहे. त्याचबरोबर खासदारांच्या पत्र व्यवहाराची कामे वेगाने करुन देण्यासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेवरील टंकलेखनावर प्रभुत्व असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक होणे आवश्यक आहे.
2) महाराष्ट्र सदनात वाय फायची सुविधा तर देण्यात आली आहे, परंतू त्याचा दर्जा चांगला नसल्याने खोलीच्या आतमध्ये मोबाईलला रेंज मिळत नाही. त्यामुळे आलेले फोन घेताना व करताना, त्याचबरोबर मोबाईल, लॅपटॉपवर काम करताना, वाय-फायचे कनेक्शन व्यवस्थित मिळत नसल्याने काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असं वायकर यांनी म्हंटलं आहे.
3) महाराष्ट्र सदनामध्ये उपहारगृहाची जी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये मिळणाऱ्या खादय पदार्थांचे दर ही जास्त असून, पदार्थांचा दर्जाही चांगला नाही. नागपूर येथील आमदार निवासातील उपहारगृह मधील पदार्थाचे दर व ‘महाराष्ट्र सदन’ उपहारगृहातील खादयपदार्थाचे दर यात मोठ्या प्रमाणात तफावत आहेत. या सर्वांचा विचार करुन सुधारणा होणे अपेक्षित आहे.
4) पावसाळयात काही वेळा अधिका-यांच्या आदेशावरुन सदनातील खोल्यांमध्ये नळाद्वारे मिळणाऱ्या गरम पाण्याची व्यवस्था बंद ठेवण्यात येते. अशावेळी महाराष्ट्र सदनांच्या खोल्यांमध्ये राहणा- यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. त्यामुळे अधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर जर गरम पाण्याची व्यवस्था बंद करण्यात येत असेल तर सदनातील खोल्यांमध्ये राहणा-यांना गरम पाणी मिळावे यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
5. सदनाच्या खोल्यांमधील पलंगावरील गादया, फर्नीचर हया जुन्या झाल्या असून, त्या बदलणे त्याचप्रमाणे नळाला येणारे पाणी पूर्णतः शुध्द मिळणे आवश्यक आहे.
तरी या पत्राच्या माध्यमातून नवीन महाराष्ट्र सदनामध्ये मी सुचविलेल्या सुविधांचा व सुधारणेचा विचार करण्यात यावा, ही विनंती. त्यामुळे आता वायकर यांच्या पत्रामुळे महाराष्ट्र सदनातील त्रुटी दूर होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.