शनिवारी साखळदंडानं बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेचं नाव ललिता कायी कुमार एस असं आहे. ती उच्चशिक्षित असून योगासनांचं पुढील शिक्षण घेण्यासाठी ती १० वर्षांपूर्वी तमिळनाडूत आली होती. तिथून ती रोणापाल-सोनुर्ली सीमेवरील जंगलात कशी पोहोचली, याचा तपास पोलीस करत आहेत. ललिता कायी गोव्यातील एका हॉटेलात राहत होती. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी गोव्याच्या दिशेने तपास सुरू केलाय. त्याचप्रमाणे गोव्यातील मडुरा रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी मडगांव येथे पोलीस पथक रवाना झालं आहे. या घटनेचं गूढ उलगडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यासाठी पोलिसांचा तपास युद्ध पातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार; ललिता ही परदेशी महिला गोव्यातील एका हॉटेलमध्ये दोन दिवस राहिली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावेळी तिच्या सोबत कोण होतं याबद्दलचा तपास सुरु आहे. त्याचप्रमाणे तिच्या मोबाईलचा सीडीआरदेखील लवकरच उपलब्ध होणार आहे. आणि त्यानंतर तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. सकाळपासून सिंधुदुर्ग बांदा पोलिसांचे पथक मडुरा रेल्वे स्टेशन परिसरात स्थानिकांकडे शोध चौकशी करत आहेत. ललिता या ठिकाणीच उतरून रोणापाल येथील जंगलात गेल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला असून त्यादृष्टीने तपास केला जात आहे. तसंच पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तामिळनाडूत तपासासाठी गेले असून महिलेच्या आधारकार्डवर असलेल्या पत्त्यावर हे पथक कसून चौकशी करणार आहे.
जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली बैठक
सिंधुदुर्गाचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी तपासातील प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलावली असून तपास कामाचा आढावा घेऊन पुढील तपासाची दिशा कशी असावी याबाबत मार्गदर्शन केलं. सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथकं आधार कार्डवर असलेल्या तामिळनाडूतील पत्त्यावर गेली आहेत. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ललिताच्या पतीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिंधुदुर्गातील पोलिसांचं दुसरं पथक देशी ललिताच्या पतीला ताब्यात घेण्यासाठी तामिळनाडूला रवाना झालं आहे. पतीला ताब्यात घेतल्यावरच सर्व घटनेचा खुलासा होणार आहे. ललिता जंगलात एका गुराख्याला साखळदंडानं बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती, त्या गुराख्याचीदेखील चौकशी केली जात आहे.
या घटनेची दखल अमेरिकन दुतावासाने घेतल्याने पोलिसांवर तपासासाठी दबाव येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस या घटनेबाबत परिपूर्ण माहिती देण्यास नकार देत आहेत. परदेशी महिलेवर गोवा बांबोळी रुग्णालयात उपचार सुरु असून महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. मात्र या ठिकाणी कडक पोलीस पहारा ठेवण्यात आला असून कोणालाही भेटण्यास नकार दिला जात आहे. याबाबतचा अधिक तपास सिंधुदुर्ग बांदा पोलीस करत आहेत.