पुण्यात १८० गावांना ‘पूर’धक्का, ५७४ हेक्टर शेती बाधित, पंचनामे तयार; शासनाकडून मदतीची आशा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या पुरामुळे पुणे शहर, हवेली तालुका आणि पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १३ हजार पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. दुसरीकडे, जिल्ह्यातील १८० गावे बाधित झाली असून, त्यातील ५७४ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पुणे शहरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे सुमारे साडेचार हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांच्या मदतीने नुकसानग्रस्त भागातील पूरग्रस्तांचे पंचनामे केले आहेत. सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडे अंतिम प्रस्ताव पाठवला जाईल.

जिल्ह्यात ५७४ हेक्टरचे नुकसान

पुणे शहरासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १८० गावांना पूरस्थितीचा फटका बसला असून, १६६१ शेतकरी बाधित झाले आहेत. एकूण ५७४.९१ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. हे प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सोयाबीन आणि भात पिकांना मोठा फटका बसला आहे. ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या भागांत पुणे शहर, हवेली, तसेच पिंपरी-चिंचवड आणि भोर तालुक्यांतील भागांचा समावेश आहे.

९० टक्के घरी परतले

अतिवृष्टीमुळे पुण्यातील अनेकांच्या घरांत पुराचे पाणी शिरून कागदपत्रे वाहून गेली आहेत. त्यामुळे त्या नागरिकांना नवीन कागदपत्रे तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुणे शहर आणि हवेली तहसील कार्यालयांत १४ मदत केंद्रे सुरू केली आहेत. आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रांचीही पूर्तता केली जात आहे. अस्वच्छता, दुर्गंधी दूर करण्यासाठी औषधे फवारण्यात आली असून, स्थलांतरितांपैकी ९० टक्के नागरिक घरी परतले आहेत, असेही जिल्हा प्रशासनाने सांगितले.

शहरासह जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि शेतीच्या नुकसानीबाबतचा अहवाल सरकारकडे पाठविला आहे. येत्या दोन दिवसांत शहरातील पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण केले जातील. सरकारचे आदेश येताच आम्ही संबंधित पूरग्रस्तांना मदत देऊ.

ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी

मदतीसाठी अटी शिथिल?

शहरातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी आता काही अटी शिथिल करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत. त्यानंतर तातडीने पूरग्रस्तांना मदत देण्यात येणार आहे. कोणत्याही अटीचा अडथळा न येता पूरग्रस्तांना सहाभूनुभूतीपूर्वक मदत करण्याचा सरकारचा विचार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘पूरग्रस्तांना भरीव मदत द्या’

‘मुठा नदीकाठच्या पूरग्रस्तांना राज्य सरकारने पाच हजार रुपयांची अपुरी मदत न देता नुकसानीच्या प्रमाणात भरीव मदत द्यावी आणि मदतीचे वाटप त्वरित व्हावे,’ अशी मागणी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे. अनेक भागांत पाणी शिरल्याने छोटे दुकानदार आणि रहिवासी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रापंचिक साहित्य वाहून गेले आहे, याकडे जोशी यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना दिलेल्या निवेदनात लक्ष वेधले आहे.

कुठे किती पंचनामे

  • हवेली तालुका – ८२१
  • पुणे शहर – ६९००
  • पिंपरी-चिंचवड अपर तहसीलअंतर्गत – ५१२४

Source link

574 hectors agriculture affectedmaharashtra sarkarpune flood effectpune rainfallstatitics of pune rainपुण्यातील धुवाधार पाऊसपुण्यातील पूरस्थितीपुण्यातील १८० गाव बाधितमहाराष्ट्र सरकारची पूरग्रस्तांना मदतशेतीचे नुकसान
Comments (0)
Add Comment