काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची महापालिकेत वर्णी कशी लागते? आयएएस अधिकारी नसतानाही सुधाकर शिंदे महापालिकेत कसे? यासारखे प्रश्न विधान परिषदेत उपस्थित करण्यात आले होते. विधानसभेत आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू, तर विधान परिषदेत अनिल परब यांनी सुधाकर शिंदे यांच्या नियुक्तीचा विषय उचलून धरला होता.
कोण आहेत सुधाकर शिंदे?
सुधाकर शिंदे हे भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांचे चुलत भाऊ आहेत. ते भारतीय महसूल सेवा अर्थात आयआरएस अधिकारी आहेत. २४ नोव्हेंबर २०१५ रोजी डॉ. सुधाकर शिंदे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आले होते. त्यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर २०२३ रोजी संपला होता. आठ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही संबंधित अधिकारी अजूनही महाराष्ट्रात कसे? हा प्रश्न विरोधकांनी विचारल्यामुळे विधान परिषदेत मोठा गोंधळ झाला होता.
वडेट्टीवार आक्रमक
नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली आहे. याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. नोव्हेंबर २०२३ पुढे सुधाकर शिंदे यांना सेवेत वाढ देता येणार नाही हा स्पष्ट उल्लेख बदलीच्या आदेशात करण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या आठ महिन्यात सुधाकर शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने आठ महिन्यात घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का? हे देखील आता सरकारने स्पष्ट केले पाहिजे, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.
पनवेल महापालिकेचे पहिले आयुक्त
सुधाकर शिंदे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केलं आहे. ते पनवेल महापालिकेचे पहिले आयुक्त होते. पनवेलला असतानाही शिंदेंच्या नियुक्तीवरुन तत्कालीन भाजप नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणत त्यांच्या बदलीची मागणी केली होती.
काय झालं होतं त्यावेळी?
पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी असतानाही सुधाकर शिंदे चर्चेत होते. आयुक्तपद स्वीकारल्यापासून सुधाकर शिंदे आणि सत्ताधारी भाजप यांच्यात वाद होते. भाजपच्या नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. ५० विरुद्ध २२ इतक्या मतांनी तो मंजूरही झाला होता.