धैर्यशील माने हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.
शिवसेना पक्षाने लोकसभेची जबाबदारी युवा खासदारांवर सोपवलेली आहे. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे लोकसभेत शिवसेना पक्षाचे गटनेते आहेत. त्यानंतर आता धैर्यशील माने यांची संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुतीत लढली होती. शिवसेनेने १३ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी सात जागांवर त्यांना विजय मिळाला होता.
श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने यांच्यासह रवींद्र वायकर, नरेश म्हस्के, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, संदिपान भुमरे हे लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे खासदार आहेत. त्यापैकी युवा चेहऱ्यांवर पक्षाची भिस्त असल्याचे दिसते.
कोण आहेत धैर्यशील माने?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाच्या तिकिटावर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला. त्यांना पाच लाख २० हजार १९० मतं मिळाली होती. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार सत्यजीत (आबा) पाटील सरुडकर यांचा जेमतेम १४ हजार मतांनी पराभव केला होता. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
यावर्षी ते सलग दुसऱ्यांदा संसदेत पोहोचले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही हातकणंगलेतूनच धैर्यशील माने विजयी झाले होते. त्यावेळी त्यांना ५,८५,७७६ मते मिळाली होती.
धैर्यशील माने हे बड्या राजकीय कुटुंबाचे वारसदार आहेत. धैर्यशील माने यांनी पंचायत सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यांचे आजोबा दादाराव माने हे काँग्रेस खासदार होते, तर मातोश्री निवेदिता माने यांनीही खासदारकी भूषवली आहे.