अमरावती शहरातील राजापेठ परिसरात राहणारी युवती कॉलेजला जात असताना सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून परिसरात आणि खासकरुन तरुणींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॉलेजला जात असताना अचानक तरुणाकडून चाकू हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथील एका महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थिनी सकाळच्या सुमारास राजापेठ अंडरपासमधून महाविद्यालयात जात होती. तेवढ्यात तिच्यावर एका युवकाने चाकू हल्ला केला. या चाकू हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तरुणीवर सध्या अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्यावर हल्ला करणारा संबंधित आरोपी तरुण हे एकमेकांना ओळखत असल्याचं बोलल्या जात आहे. राजापेठ अंडरपास परिसरातून तरुणी जात असताना त्या ठिकाणी या तरुणाने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर तरुणीने आरडाओरड केली.
आरडाओरड एकताच परिसरातील नागरिकांनी आणि रिक्षा चालकांनी धाव घेत तरुणीला वाचवलं आणि संबंधित तरुणाला पकडलं आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर संबंधित मुलीला उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीला अटक करून पोलिसांनी ठाण्यात नेले आहे. हा हल्ला कुठल्या कारणावरून करण्यात आला या संदर्भात पुढील तपास पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात राजापेठ पोलीस स्टेशन करत आहे. पण, अशाप्रकारे दिवसाढवळ्या तरुणींवर हल्ले होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.