काय प्रकरण?
कापडाच्या दुकानासमोर बॉम्ब दिसल्याची माहिती दुकानदाराने पोलिसांना दिल्यानंतर, पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास केला. त्यावेळी दुकानाबाहेर एका बॅगमध्ये बॉम्बसारखी वस्तू दिसली, त्यात लाइट दिसत होती, तसंच त्यातून टिकटिक आवाज येत होता. पोलिसांनी त्वरित चंद्रपूर येथील बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथकाला पाचारण केलं.
बॉम्ब शोधक पथकाने तपास सुरू केला. त्यावेळी बॅगेत आढळलेली बॉम्बसदृश वस्तू नकली असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास केला. त्यात एक व्यक्ती कापडाच्या दुकानासमोर बॅग घेऊन गेल्याचं दिसून आलं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे ती बॅग ठेवणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं.
दुकानासमोर बॉम्बसदृश वस्तू ठेवण्यामागे काय होतं कारण?
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी केली. त्यावेळी धक्कादायक घटना बाब समोर आली. पोलिसांच्या चौकशीत दोघांनी दिलेल्या माहितीत सांगितलं, की त्यांच्यावर खूप कर्ज होतं. ते कर्ज फेडण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी दुकानासमोर नकली बॉम्बसारखी दिसणारी वस्तू ठेवली, त्यानंतर बॅगमध्ये बॉम्ब असल्याचं सांगत दुकानदाराकडून खंडणी वसूल करण्याची त्यांची योजना होती.
त्याचसाठी त्यांनी दुकानासमोर टिकटिक आवाज येणारी वस्तू ठेवली होती. त्यांनी खंडणी वसूल करण्याआधीच बॉम्बसदृश वस्तू दिसल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती आणि या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. सध्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.