नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांच्यावर २० सदस्यांनी अविश्वासाचा ठराव जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे दिला होता. त्या अनुषंगाने नंदुरबार येथील जिल्हा परिषदेत आज निवासी जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांच्या अध्यक्षतेखाली ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेचे एकूण ५६ सदस्य असून त्यापैकी ५१ सदस्य उपस्थित होते. तर पाच सदस्यांनी दांडी मारली. यात भाजपच्या सभासपतींसह दोघांचा सहभाग होता. नंदुरबार जिल्हा परिषदेत यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात डॉक्टर सुप्रिया गावित यांना २९ मते पडले. तर विरोधात एकही मत पडले नाही. विरोधक सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे सुप्रिया गावित यांच्यावरील अविश्वास बारगळला आहे. येत्या सहा महिन्यात नंदुरबार जिल्हा परिषदेची मुदत संपणार आहे.
पाच जिल्हा परिषद सदस्य गैरहजर
नंदुरबार जिल्हा परिषदेत ५६ सदस्य असून यामध्ये काँग्रेसचे २३, भाजपचे २३, शिंदे सेनेचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, तर उबाठा शिवसेनेचा एक सदस्य आहेत. आजच्या सभेला पाच सदस्य अनुपस्थिती होते. यात भाजपच्या ३, उबाठा शिवसेना १, राष्ट्रवादी १ सदस्याचा समावेश आहे. यात महिला बाल कल्याण सभापती संगीता गावित, भाजपचे भरत गावित, ऐश्वर्या रावल, उबाठाचे गणेश पराडके, राष्ट्रवादीचे रतन पाडवी हे सदस्य अनुपस्थित होते. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे ज्यांनी अविश्वासाचा ठराव दिला होता, त्यांनीच डॉक्टर सुप्रिया गावित यांच्याकडून मतदान केले.
आमच्या सदस्यांची फसवणूक
माझ्यावर अविश्वास ठराव ज्यावेळी आणला, त्यावेळी आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना खोटे सांगून त्यांची स्वाक्षरी घेतली. ज्यावेळी सदस्यांना याची कल्पना आली. त्यावेळी त्यांनी मला भेटून ही गोष्ट सांगत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन दिले. आमच्या सदस्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता. दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता, असे जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले.
अविश्वास प्रस्ताव हा ड्रामा
आम्ही वेळोवेळी सांगत होतो की हा २० अविश्वास प्रस्ताव गावित परिवाराचा ड्रामा आहे, हे आज सिद्ध झाले, ज्यांनी अविश्वास ठराव आणला त्यांनीच आज अध्यक्षांना मतदान केले. हा जिल्ह्याला मूर्ख बनवण्याचा उद्योग असून शासनाच्या वेळेचा अपव्यय आहे. आम्ही लढू, जिंकू आणि आमचा अध्यक्ष बसवू, असे शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य ॲड. राम रघुवंशी यांनी सांगितले.