पत्नीच्या चारित्र्यावर संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ वर्षांपूर्वी मीना यांचं नीलचंदसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस ते तुमसरला राहिले. त्यानंतर नागपुरातील भांडेवाडी येथे राहायला आले. नीलचंद हा मीना यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दारू पिऊन त्यांना मारहाण करायचा. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून मीना या पतीपासून वेगळ्या राहायल्या लागल्या. आठ दिवसांपूर्वी त्या धम्मकिर्तीनगर येथे भाड्याने राहायल्या आल्या. नीलचंद हा सतत मोबाइलद्वारे मीना यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा. मात्र मीना यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.
सोमवारी नीलचंदने अन्य क्रमांकावरून मीना यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. मीना यांनी मोबाइल रिसिव्ह केला. मी गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या भावाकडे आलो आहे. मला तुलाही भेटायचे आहे, असे नीलचंद म्हणाला. मीना यांनी नकार दिला. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तु मला एकदा भेट, तुझ्या जीवनामध्ये तू खुश राहा, असे नीलचंद त्यांना म्हणाला. परंतु मीना यांनी भेटण्यास नकार दिला.
ब्लेडने वार केले आणि…
मीना यांच्या नकारानंतरही रात्री आठ वाजताच्या सुमारास नीलचंद हा मीना यांच्या घरात घुसला. येथे कशाला आला अशी विचारणा मीना यांनी केली. नीलचंदने आतून दरवाजा बंद केला. मी तुला सोडणार नाही, तुला मारल्यानंतर मी स्वत:लाही संपवेल, असे म्हणत नीलचंदने मीना यांच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. मीना यांनी ब्लेड हिसकावले. नीलचंदने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.
मीना यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. शेजारी जमले. परंतु दरवाजा आतून बंद होता. मीना यांनी नीलचंदच्या हाताला चावा घेतला. दरवाजा उघडला. एका नागरिकाने वाडी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. जखमी मीना यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
स्वत:चाही जीव घेण्याचा प्रयत्न
नीलचंदच्या हाताला चावा घेतल्यानंतर मीना यांनी दरवाजा उघडला. ब्लेड दरवाजाजवळच फेकले. नीलचंदने हे ब्लेड उचलले. स्वत:च्या शरीरावर ब्लेडने वार करून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्याला पकडले. नीलचंदला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.