बुलढाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले अजय गिरी सध्या बुलढाणा येथील पोलिस वसाहतीमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वींच त्यांची मुंबई येथून बुलढाण्यात बदली झाली होती. बुलढाण्यात आल्यानंतर असे नेमके काय झाले ज्यामुळे अजय गिरी यांना स्वत:च्या आयुष्याची दोर कापावी लागली? याबद्दल स्थानिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
बुलढाणा पोलिसांवर शोककळा
अजय गिरी यांनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांनी उचलेल्या टोकाच्या पावलामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच यांच्या निधनाने बुलढाणा पोलीस आणि पोलीस वसाहतीवर शोककळा पसरली आहे.
डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण….
अजय गिरी यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते जागेवरच कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गिरी यांना काही मिनिटांतच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
साप्ताहिक सुट्टी, दिवसभर घरीच होते, घरगुती वादाची किनार असल्याची चर्चा
अजय गिरी यांची बुधवारी (आज) साप्ताहिक सुट्टी होती. त्यामुळे दिवसभर ते घरीच होते. सायंकाळच्या सुमारास कुठल्याशा वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने याला घरगुती वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे.