परदेशी महिलेला कोणी बांधले झाडाला?
महिलेच्या उजव्या पायाला साखळदंड घालून झाडाच्या बुंध्याला बांधून कुलूप लावून बंद करण्यात आले होते. गेले अनेक दिवस ती अशाच अवस्थेत होती, त्यात उपाशी राहिल्याने तिची प्रकृती खालावली होती. तिला खूप बोलायचं होतं काय घडलं ते सांगायचं होतं पण तोंडातून शब्दच फुटत नव्हता. मग एका चिठ्ठीवर इंग्रजीमध्ये सगळं लिहित तिने तिची माहिती दिली. या माहितीनुसार महिलेने दावा केलाय की, तिच्या पतीने तिला सिंधुदुर्ग येथील सोनुर्ली-रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळीने बांधले आणि नंतर तो स्वतःहून निघून गेला. ५० वर्षीय अमेरिकन महिलेचं नाव ललिता कायी कुमार एस. असे आहे. ती मूळची अमेरिकेची असून तिच्याकडे तामिळनाडूचं एक आधार कार्ड सापडले. व्हिसाची मुदत संपल्याने गेल्या १० वर्षांपासून ती भारतात राहते असा अंदाज मांडण्यात आला आहे. महिलेकडे सापडलेला पासपोर्ट हा अमेरिकेचा आहे,अधिकची माहिती घेतली असता असं समजतंय की ही महिला १० वर्षांपूर्वी योग अभ्यासासाठी भारतात आली होती, तेव्हाच तिची भारतीय नागरिकाशी ओळख झाली आणि यातूनच दोघांनी लग्न केले आणि ते एकत्र तामिळनाडूत राहू लागले.
पतीला केली अटक..
नवऱ्यानेच मला बांधून ठेवलं असा दावा या महिलेने केलाय. ही महिला मानसिक आजाराने त्रस्त असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं. तिच्याकडून उपचाराच्या काही प्रिस्क्रिप्शन स्लिपही पोलिसांना सापडल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. ही विदेशी महिला गोव्यातील एका हॉटेलमध्ये राहायला होती.हा धक्कादायक प्रकार तिच्या पतीकडून केला गेला असावा असा अंदाज, पण ही विदेशी महिला तामिळनाडू येथून याठिकाणी कशी पोहोचली? याची माहिती घेण्यासाठी तामिळनाडू येथील स्थानिक पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.आधारकार्डवर असलेल्या पत्त्याच्या आधारे पतीला अटक केली. सोबतच तिच्या पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचीही माहिती मिळत आहे.
तामिळनाडू मधून थेट सिंधुदुर्गं कनेक्शन काय?
सिंधुदुर्गातील पोलिसांचं दुसरं पथक तिच्या पतीला महाराष्ट्र पोलीसांच्या ताब्यात घेण्यासाठी तिकडे रवाना झाले आहे. पतीला ताब्यात घेतल्यानंतरच सर्व घटनेचा खुलासा होणार आहे. सोबतच त्या गुराख्याची देखील पोलीस चौकशी करणार आहेत. दुसरीकडे सिंधुदुर्ग पोलिसांनी गोव्याच्या दिशेने तपास सुरू केलाय. गोव्यातील मडुरा रेल्वे स्टेशन वरील CCTV फुटेज तपासले गेलेत, पण त्यात ही महिला कुठेही आढळून न आल्याने प्रकरणात गूढ वाढलंय. जर तिला मडुरा स्थानकातून जंगलात आणले नसेल तर नेमके कुठून आणले? याचा तपास सुरु असून यासोबत इतर स्थानकातील अन्य CCTV फुटेज तपासणी सुरू आहे.
तिच्यासोबत असलेल्या मोबाईलवरून तिने कोणाशी संपर्क केला? यावरुन पोलीस सध्या तिच्या कुटुंबियांविषयी माहिती घेत आहेत. या घटनेचे गूढ उलगडण्याचे आव्हान पोलीसांसमोर असून तपास युद्ध पातळीवर सुरू आहे. अशातच या घटनेची दखल अमेरिकन दुतावासाने घेतल्याने पोलिसांवर तपासासाठी दबाव येत आहे. एकीकडे या प्रकरणाचं गूढ उलगडण्याचे पोलीसांसमोर आव्हान असताना दुसरीकडे पोलीस या घटनेबाबत परिपूर्ण माहिती देण्यात नकार देत आहेत.
या विदेशी महिलेवर सद्या गोव्यातील बांबोळी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलीये. मात्र या ठिकाणी कडक पोलीस पहारा असून कोणालाही भेटण्यास नकार दिला जात आहे
याबाबतचा अधिक तपास सिंधुदुर्ग बांदा पोलीस करत आहेत.
मागच्या ४० दिवसांपासून आपण या जंगलात होतो असा या महिलेने दावा केलाय पण दावा कितपत खरा आहे? ही अमेरिकन महिला भारतात कशी आली? तिला जंगलात बांधून ठेवण्यामागचं कारण काय? तिच्यासोबत नेमकं काय घडलं असावं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सध्या अनुत्तरीत आहेत.