यंदा ७ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी २ ते १७ सप्टेंबरदरम्यान मुंबईसह ठाणे, पालघर विभागातून जादा गाड्या चालवण्यात येणार आहेत. वैयक्तिक आरक्षणासह समूह आरक्षणामध्ये सर्व सवलतींचा लाभ प्रवाशांना आरक्षण करतानाच देण्यात येणार आहेत.
गेल्यावर्षी उत्सवासाठी कोकणात साडेतीन हजार बसगाड्या चालवण्यात आल्या होत्या. यंदा प्रवासी मागणी वाढल्याने ८०० गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. उत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी महामंडळाने स्थानक आणि आगारांमध्ये वरिष्ठ कर्मचाऱ्यांना तैनात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एसटीतील सर्व दुरुस्ती पथके सज्ज ठेवून आवश्यक साहित्यांची आगाऊ मागणी नोंदवण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. महामार्गावरील थांब्यांवर महिला आणि पुरुष प्रवाशांच्या सुविधेसाठी तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येत आहे.
इथे करा आरक्षण…
महामंडळाच्या आरक्षण केंद्रासह npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर विशेष गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. त्या MSRTC Bus Reservation मोबाइल अॅपवर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून, लवकरच ते पूर्ण होईल, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या आणखी २० विशेष फेऱ्या
मुंबई : गणेशोत्सवातील कोकणातील रेल्वेगाड्यांतील गर्दी विभागण्यासाठी आणखी २० फेऱ्यांची यादी कोकण आणि मध्य रेल्वेने जाहीर केली आहे. सर्व विशेष फेऱ्यांना पेण स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. या विशेष फेऱ्यांमुळे मध्य-पश्चिम-कोकण रेल्वेमार्ग धावणाऱ्या विशेष फेऱ्यांची संख्या २७८वर पोहोचली आहे. विशेष गाड्यांचे आरक्षण खुले करण्यात आले असून, गाड्यांच्या सविस्तर माहितीसाठी रेल्वेच्या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.