काय आहे प्रकरण?
घाटकोपर पश्चिमेला इंदिरा नगर येथे असलेल्या येथील केव्हीके घाटकोपर सार्वजनिक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्याह्न भोजनात मंगळवारी भातात झुरळ सापडले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शाळा शिक्षकांकडे तक्रार केली. शाळा शिक्षकांनीही तातडीने ही बाब शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणली. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत या शाळेत याआधीही पालक-शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी आक्षेप नोंदवला होता. आमच्या शाळेत अत्यंत निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार दिला जातो. यापूर्वी २०२२ पर्यंत या शाळेत इस्कॉनकडून माध्याह्न भोजन पुरवले जात होते. मात्र त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी हे कंत्राट बचत गटाला दिले आहे. मुलांना दिले जाणारे अन्न सुरुवातीला चवीसाठी शिक्षकांना देण्याची पद्धतही बंद करण्यात आली. तसेच पालिकेकडून अन्न परीक्षण करण्यात यावे, अशा सूचना असूनही ते केले जात नाही, अशी माहिती एका शिक्षकाने गोपनीयतेच्या अटीवर दिली. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून त्यानंतरच कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून त्यानंतरच कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
पालकांकडून अधिक कठोर कारवाईची मागणी
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका रिमा डिसुझा यांच्याशी संपर्क साधला असता शाळा प्रशासन या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या चौकशीत घडल्या प्रकारात तथ्य आढळल्यास कंत्राटदाराला मेमो दिला जाईल, असे त्या म्हणाल्या. मात्र पालकांकडून अधिक कठोर कारवाईची मागणी होत आहे.