काय आहे प्रकरण?
चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एकोणवीस वर्षीय पीडित महिलेला पोटदुखीचा त्रास सुरू होता. पती, सासू, सासरे, नणंदेसोबत राहणाऱ्या विवाहितेला माहेर व सासरच्या नातलगांनी डॉक्टरांकडे नेले. मात्र, तब्येत सुधारत नसल्याने तिला वडाळा गावातील हकिमाकडे जाण्याचा सल्ला कोणीतरी दिला. त्यानुसार पीडित महिला संशयित शेख याच्याकडे गेली. त्याने पीडितेच्या सासू व नणंदेला बाहेर थांबण्यास सांगून पीडितेला घरात नेले. तिथे पीडितेला विभूतीसारखा पदार्थ चाखण्यासाठी दिला. तसेच एका पावडरची फुंकर तिच्या चेहऱ्यावर मारली. त्यानंतर संशयिताने पीडितेवर २६ जुलै रोजी बलात्कार केला. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने मनस्थिती स्थिर झाल्यावर इंदिरानगर पोलिस ठाणे गाठत फिर्याद नोंदविली. तर शहर पोलिसांत यापूर्वीही संशयिताविरुद्ध एक गुन्हा नोंद असल्याचे कळते.
भूतबाधेचाही दावा?
पीडितेला कोणतरी खाद्यपदार्थातून करणी केल्याने भूतबाधा झाल्याचा दावा संशयिताने केला होता. ही भूतबाधा काढण्यासाठी चार दिवस उपचार करावे लागतील. त्यासाठी साडेपाच हजार रुपये खर्च असल्याचेही त्याने सांगितले. दोन दिवसांनी पुन्हा पीडितेला बोलविल्यानंतर त्याने गुंगीचे औषध देत पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान, संशयित हा जवळच्या मशिदीमध्ये कथित मौलाना असल्याचेही कळते. गेल्या पंधरा वर्षांपासून तो वडाळा परिसरात वास्तव्यास आहे. त्याचा टेलरिंग हा मूळ व्यवसाय असून, जोडीला हकीम व मौलाना म्हणूनही तो वावरतो. पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त केल्यानंतर त्यामध्ये महिलासंदर्भातील बऱ्याच आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्या आहेत. याप्रकरणी पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत.
संशयित शेख याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली असून, त्याचा मोबाइल जप्त केला आहे. त्यामध्येही महत्त्वाचे मुद्दे असून त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.– अशोक शरमाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, इंदिरानगर
अंगातील भूत उतरविण्याच्या उद्देशाने महिलेशी गैरकृत्य घडल्याचे कळते. संशयिताविरुद्ध पोलिसांनी जाणूटोणाविरोधी कलमानुसार कारवाई करावी. या स्वरुपाच्या भोंदूबाबांच्या कृत्याला नागरिकांनी बळी पडू नये.– डॉ. टी. आर. गोराणे, राज्य प्रधान सचिव, अंनिस