पीडित तरुणीच्या शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलं आहे. आरोपी दाऊद शेख याच्या नावानेच त्यापैकी एक टॅटू असल्याची शंका आहे. टॅटू काढलेल्या व्यक्तीचा शोध घेतल्यानंतर मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात हा टॅटू काढला गेल्याची माहिती मिळत आहे.
टॅटू काढण्यास दाऊदने तरुणीला भाग पाडलं, की तिच्या संमतीने काढण्यात आला, याचाही तपास होणार आहे. कारण टॅटू काढताना दाऊद त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं बोललं जात आहे. दाऊदने मयत मुलीचा मोबाईल कुठे लपवला याचाही शोध घेण्यात येणार आहे.
दरम्यान, उरण हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद बसूद्दीन शेख (२३) याने मृत तरुणीच्या मागे लग्नासाठी व त्याच्यासोबत बंगळुरू येथे येण्यासाठी तगादा लावला होता. मात्र ती नकार देत होती. यावरून त्यांच्यात भांडण झाल्यानंतर त्याने चाकूने वार करून तिची हत्या केल्याचे तपासात निषन्न झाले आहे.
दाऊदला पनवेल सत्र न्यायालात हजर करण्यात आले असता, त्याची ७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. मृत तरुणी अनुसूचित जातीची असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात आता ॲट्रोसिटीचे कलम वाढवले आहे.
आरोपी दाऊद आणि मृत तरुणी शाळेत एकत्र शिकत होते. त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडली. मात्र तरुणी पुढे शिकत होती. दाऊदने त्यानंतर वाहन चालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये त्याने या तरुणीची छेड काढली होती. त्यावेळी त्याच्याविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात तो दीड महिना तुरुंगात होता.
जामिनावर बाहेर आल्यानंतर करोना काळात तो बंगळुरूला गेला. तिथून तो या तरुणीला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. तसेच तिला भेटण्यासाठी दोन ते तीन वेळा उरणमध्ये आला होता, असे तपासात उघड झाले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.
छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी
दाऊद २३ जुलैला कर्नाटकहून उरणमध्ये आला. त्यानंतर त्याने पीडित तरुणीची काही छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत तिला दोन वेळा भेटण्यासाठी बोलावले. २५ जुलैला ती उरण परिसरातील कोट नाका येथील पेट्रोल पंपाजवळ भेटल्यानंतर त्याने तिला पुन्हा लग्न करून त्याच्यासोबत बंगळुरूला कायमचे येण्याबाबत विचारणा केली. मात्र तिने नकार दिल्याने त्यांच्यात भांडण झाले व दाऊदने चाकूने तिच्या पोटावर व पाठीवर वार करून तिची हत्या केली. त्यांनतर कळंबोली मॅकडोनाल्ड येथून बस पकडून कर्नाटक येथे पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले.