सात हजार बुडते जीव वाचविणारा ‘दीपक’! अकोल्यातील सदाफळे विनामोबदला करतायत २५ वर्षांपासून सेवाकार्य

नीरज आवंडेकर, अकोला : पावसाळ्याच्या दिवसांत कुणी पुरात वाहून जातो, नदीत आत्महत्येचा प्रयत्न करतो. या बुडत्या जीवांना वाचविण्यासाठी तत्पर असलेले वऱ्हाडातील नाव म्हणजे दीपक सदाफळे. अकोल्याजवळील पिंजर गावातील दीपक यांनी जवळपास ६ हजार ९६७ जीव वाचविले आहेत. ३ हजार ७२२ मृतदेह शोधून बाहेर काढले. अमरावती विभागच नव्हे तर संपूर्ण राज्यात आणि बाहेरही त्यांनी ही सेवा दिली आहे. कुठलीही आर्थिक मदत न घेता त्यांचे हे सेवाकार्य मागच्या २५ वर्षांपासून सुरू आहे.

कोण आहेत दीपक सदाफळे?

घरची बेताची परिस्थिती असल्याने संकटे अनेक आली. मदतीसाठी गेल्यानंतर उपेक्षाच पदरी पडली. पावलोपावली हा अनुभव येत गेल्याने आपण भविष्यात अशा अडलेल्यांना मदत करावी, असा चंग बाधला. १९९८मध्ये या सामाजिक कार्याची सुरुवात केली. आज दीपक यांनी तब्बल ८० शाखांचे जाळे विणले आहे. त्यांच्यासोबत ३ हजार ६६० स्वयंसेवकांची चमू आहे. या चमूमध्ये दहा मुलींचासुद्धा समावेश आहे. कुठलेही संकट असले तरी ही चमू मदतीसाठी तत्पर असते.

मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन पिंजरच्या माध्यमातून दीपक यांचे हे कार्य सुरू आहे. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक असेही नावही त्यांनी दिले आहे. मदत कार्यासोबत हे पथक आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, जनजागृती, जीवनरक्षक, रुग्णसेवा, रस्ते अपघात, प्राणिसेवा, सामाजिकसह इतरही समाजपयोगी सेवा नि:स्वार्थपणे देत आहेत. या चमूने आतापर्यंत उत्तराखंड, माळीण, सांगली, कोल्हापूर, पंढरपूरमध्ये शोध व बचाव कार्य केले आहे. मुळात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यान्वित असतो. मात्र कुठेही काही आपत्ती आली तर सर्वप्रथम आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचत बचाव पथकाला बोलविले जाते, हे विशेष.

राष्ट्रपती पुरस्कारासाठी नामांकन पण…

संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने केलेली गौरवास्पद कामगिरीची दखल घेऊन दीपक सदाफळे यांना जिल्हा प्रशासनाने २०१७मध्ये राष्ट्रपती पुरस्कारासाठी नाव पाठविले होते. पुढे पाठपुरावा न झाल्याने ही संधी हुकली, असेही दीपक सांगतात.
भीमा नदीत भली मोठी मगर, उजनीत जाणार की दौंडला भीती दाखवणार? शेतकरी भयभीत, मच्छिमार चिंतेत
कुठलाही आर्थिक मोबदला न घेता मागील २५ वर्षांपासून आम्ही आपत्कालीन बचाव सेवा देत आहोत. अकोल्यासह संपूर्ण देशभरात ही सेवा देऊन बऱ्याच लोकांचे जीव वाचविले. रेस्क्यू ऑपरेशन करताना येणाऱ्या अडचणी व त्यासाठी लागणारे साहित्य सरकारने पुरविल्यास काम अधिक सोपे होऊ शकते. अधिकाधिक लोकांचे जीव वाचविले जाऊ शकते.- दीपक सदाफळे, जीवरक्षक

Source link

deepak sadaphale akoladrown in riverdrowned to deathsave drowning peoplesocial workerअकोला बातम्याराष्ट्रपती पुरस्कार सन्मानस्वयंसेवक
Comments (0)
Add Comment