गायत्री बाबासाहेब दाभाडे (वय २१ वर्ष रा. संतोषी माता नगर वैजापूर) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. तर दत्तू बाबासाहेब गायके (राहणार जानेफळ तालुका वैजापूर) असे एकतर्फी प्रेमातून धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
दत्तूचे वारंवार फोन, आत्महत्येची धमकी
गायत्रीची मावशी कल्पना गजानन सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हटले की, गायत्री सिडको एन ५ भागातील विजयश्री कॉलनीतील होस्टेलमध्ये राहून बीएचएमएसचे शिक्षण घेत होती. यावेळी आरोपी दत्तू हा गावातील असून त्याने गायत्रीला वारंवार फोन करून त्रास दिला होता. तू माझ्याशी फोनवर बोल, तू मला भेटली नाही तर मी विद्युत डीपीवर चढून माझं आयुष्य संपवेन, अशा धमक्या तो देत होता.
दत्तूच्या सततच्या त्रासाला कंटाळून गायत्रीने होस्टेलमधील फॅनला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यामध्ये दत्तू गायके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार तेलुरे करीत आहेत.
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
राज्यात सध्या एकतर्फी प्रेमातून तरुणींना त्रास देण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अमरावती येथे एका व्यक्तीने एकतर्फी प्रेमातून कॉलेजला जाणाऱ्या तरुणीवर चाकू हल्ला केला होता. तर उरण येथील २० वर्षीय तरुणीच्या हत्याप्रकरणाने तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं आहे. दाऊद शेख या आरोपीने तरुणीला अत्यंत निर्घृणपणे संपवलं. तिच्यावर चाकूने वार करुन तिची हत्या केली. या तरुणीने लग्नास नकार दिल्याने दाऊदने तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दाऊद शेखला अटक केली आहे. या साऱ्या घटनांमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.